परराष्ट्र खात्याच्या निर्णयानुसार काही ई मेल गोपनीय जाहीर
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री व अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या खासगी सव्‍‌र्हरवरून अनेक ई मेल पाठवले होते. त्यातील सात ई मेल मालिकातील माहिती परराष्ट्र खात्याने रोखली आहे, या ई मेलमध्ये अनेक सरकारी गोपनीय बाबींचा समावेश होता. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ही माहिती जाहीर केली. क्लिंटन यांच्या खासगी सव्‍‌र्हरवरून पाठवलेली २२ कागदपत्रे म्हणजे ३७ पाने परराष्ट्र खात्याने रोखली आहेत. ही कागदपत्रे पाठवली तेव्हा ती वर्गीकृत नव्हती, पण आता ती वर्गीकृत गटात टाकली आहेत ,असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले.
परराष्ट्र खात्याने आता या इमेलची चौकशी सुरू केली असून ते क्लिंटन यांच्या खासगी इमेल खात्यावरून पाठवण्यात आले होते. क्लिंटन व ओबामा यांच्यातील १८ इमेलचा त्यात समावेश आहे व गुप्तचर खात्याने केलेल्या विनंतीनुसार त्यांचा वर्गीकृत गटात समावेश करण्यात आला आहे. हा इमेल पत्रव्यवहार आता माहिती स्वातंत्र्य कायद्यात समाविष्ट नाही. गोपनीय नसलेले इमेल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. या इमेलमधील माहितीवर आपण काही बोलणार नाही असे किरबी यांनी सांगितले. क्लिंटन यांचे सर्व इमेल जाहीर करावेत अशी मागणी त्यांच्या प्रचार कार्यालयाने परराष्ट्र खात्याकडे केली होती. क्लिंटन यांचे सचिव ब्रायन फॅलन यांनी सांगितले की, इमेल संपूर्णपणे रोखण्यास आमचा विरोध आहे. त्या वेळी हे इमेल गोपनीय नव्हते पण आता गुप्तचर खात्याने त्यातील काही इमेल गोपनीय ठरवले आहेत.
रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे अध्यक्ष रेनसी प्रायबस यांनी सांगितले की, क्लिंटन यांच्या खासगी सव्‍‌र्हरवर अनेक गोपनीय इमेल आहेत, त्यामुळे ते आता जाहीर होणार नाहीत. परिणामी, क्लिंटन यांच्यावर अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी खासगी सव्‍‌र्हरवरून इमेल पाठवून देशाची सुरक्षा व राजनैतिक बाबी धोक्यात आणल्या आहेत.