इस्तंबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटातून अभिनेता ह्रतिक रोशन थोडक्यात बचावला. या स्फोटापूर्वीच काही तास अगोदर त्याने इस्तंबुल विमानतळ सोडल्याचे ट्विट केले आहे. स्फोटाच्या काही तास अगोदर इस्तंबुल विमानतळावर पुढील प्रवासासाठी नियोजित असलेले विमान सुटल्यानंतर तो विमानतळावरच अडकून पडला होता. पण लगेचच त्याने पुढील प्रवास इकॉनॉमी क्लासमधून करण्याचे निश्चित करून वेगळ्या विमानातून प्रवास सुरू केला. त्यामुळे स्फोटाच्या काही तास अगोदरच त्याच्या विमानाने विमानतळावरून उड्डाण केले होते. त्यामुळे तो या हल्ल्यातून सुखरूप बचावला.


स्फोटाची माहिती कळल्यावर आपल्याला धक्काच बसला आहे, असेही ह्रतिकने वेगळ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दहशतवाद्यांनी अनेक निरपराध लोकांना ठार केले आहे. आता आपण सर्वांना दहशतवाद्यांविरोधात एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
तुर्कस्थानमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ जणांचा मृत्यू, तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. तुर्कस्तानच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री उशीरा तीन आत्मघाती स्फोटांनी इस्तंबुलचे विमानतळ हादरले.