देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका होत असतानाच मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी या दरवाढीबाबत अजब तर्कट मांडून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमेरिकेतील हरिकेन वादळामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. आता दर स्थिर असून लवकरच ते कमी होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी होतील. त्यामुळे देशातील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असे प्रधान यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत पेट्रोलचे दर १० पैशांनी कमी झाले आहेत. तसेच यानंतरच्या काळातही दर कमी होतील, असे त्यांनी सांगितले. गुजरातमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या नोंदीनुसार, २१ ते २३ या दोन दिवसांत पेट्रोलचे दर १० पैशांनी कमी झाले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होतील, असे संकेत नुकतेच प्रधान यांनी दिले होते. पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीत समावेश करण्यास सरकारही अनुकूल आहे. पेट्रोलियम पदार्थांचा समावेश जीएसटीत करण्यात यावा, असेही केंद्र सरकारने जीएसटी परिषदेला सांगितले आहे, असेही ते म्हणाले होते.