नववी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीने शाळेच्या स्वच्छतागृहात मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हैदराबादच्या मधापूर येथील एका सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. ही पीडित विद्यार्थीनी आदिवासी समाजातील असून एका अंध विधवा महिलेची मुलगी आहे. शाळेचा तास सुरू असताना या विद्यार्थीनीच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी वर्गातील शिक्षकांनी तिला स्वच्छतागृहात जाण्यास सांगितले. स्वच्छतागृहात गेल्यानंतर काही वेळातच या विद्यार्थीनीने मुलाला जन्म दिला. काही विद्यार्थीनींच्या हे लक्षात येताच त्यांनी शिक्षकांना कळविले. त्यानंतर या मुलीला एका स्वतंत्र वर्गात आणून तिच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. मुलींच्या पालकांनाही गोष्ट कळविण्यात आली. मात्र, त्यांनाही आपली मुलगी गरोदर कशी राहिली, याबद्दल कोणतीही माहिती नाही. ही घटना शनिवारी दुपारी घडली असली तरी सोमवारपर्यंत याबाबत कोणालाही माहिती नव्हती. मात्र, राज्यातील स्थानिक वृत्तपत्रात ही बातमी झळकल्यानंतर एकच खळबळ उडाली.
ही मुलगी शिकत असणाऱ्या शाळेतील १३ शिक्षिकांपैकी एकीच्याही विद्यार्थीनी गरोदर असल्याचे लक्षात आले नाही. ही विद्यार्थींनी पोट झाकण्यासाठी स्कार्फचा उपयोग करत असे आणि बाकावर बसताना तिच्यासमोर दप्तर ठेवत असे, अशी माहिती शिक्षकांनी दिली. दरम्यान, राज्य बालहक्क सुरक्षा आयोगाने याप्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकारी तसेच वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून १५ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित मुलीच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा आरोपी अद्याप फरार आहे.