नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठ्याप्रमाणात नव्या व जुन्या नोटा सापडत आहेत. राजस्थानची राजधानी जयपूर येथे प्राप्तिकर विभागाने एका सहकारी बँकेवर छापा टाकून एका शिक्षण संस्थेने जमा केलेले एक कोटी ३८ लाख रूपयांच्या नव्या नोटा व दोन किलो सोने जप्त केले आहे. प्राप्तिकर विभागाच्या या छाप्याने राजस्थानमध्ये खळबळ माजली आहे. अनेक शिक्षण संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
जयपूर मधील मानसरोवर येथील विल्फ्रेड शैक्षणिक संस्थेने ८ डिसेंबर रोजी इंटिग्रल सहकारी बँकेत १ कोटी ३० लाख रूपये जमा केले होते. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने आज (दि. १२) बँक अधिकाऱ्यांची चौकशी केली आणि विल्फ्रेड शिक्षण संस्थेचे केशव बडाया यांचे १ कोटी ३८ लाख रूपये जप्त केले.
केशव बडाया यांनी ही रक्कम दुसऱ्या बँक खात्यातून अवैध पद्धतीने पैसे काढून इंटिग्रल सहकारी बँकेत जमा केले होते, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली. बँकेची शाखाही याच शिक्षण संस्थेच्या परिसरात आहे. जप्त करण्यात आलेल्या रकमेत २ हजार रूपयांच्या सुमारे ७ हजार नोटा आढळून आल्या. केशव बडाया सध्या पसार झाला आहे.
जयपूर येथीलच सीबीसीआयडीनेही एका गाडीतून सुमारे ६० रूपये जप्त केले. विशेष म्हणजे यातील ५६ लाख रूपये हे २ हजाराच्या नोटांच्या स्वरूपात होते. हे लोक रस्त्यावर उभे राहून कमिशनच्या बदल्यात नोटाबदलीचा व्यवसाय करत होते.
एकीकडे सामान्य लोकांना पैसे काढण्यासाठी बँक व एटीएमबाहेर तासन्तास उभे राहावे लागत आहे. तर दुसरीकडे प्राप्तिकर विभागाला मात्र कोट्यवधी रूपये मिळत आहेत. या लोकांकडे एवढ्या मोठ्याप्रमाणात नव्या नोटा कसे येतात हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.