चीनच्या अखत्यारित असणाऱ्या भागात घुसखोरी करण्यात आल्याची कबुली भारताकडून देण्यात आल्याचा नवा अपप्रचार चीनकडून सुरु करण्यात आला आहे. घुसखोरी करण्यात आल्याची कबुली भारताकडून देण्यात आल्याचा अजब दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केला आहे. ‘भारताकडून देण्यात आलेल्या घुसखोरीच्या कबुलीनंतर आता सिक्किमजवळील डोक्लाममधून माघार घेण्याचा एकमेव मार्ग भारताकडे उपलब्ध आहे,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे.

‘योग्य आणि अयोग्य काय, हे आता स्पष्ट झालेले आहे. भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच चिनी सैन्याने घुसखोरी केली नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता भारताने डोक्लाममधून सैन्याला माघारी परतण्याचे आदेश द्यावेत,’ असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बँकॉकमध्ये बोलताना म्हटले. डोक्लाममध्ये भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर पहिल्यांदाच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भाष्य केले. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

‘भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अगदी जाहीरपणे चीनकडून घुसखोरी झाले नसल्याचे म्हटले आहे. या विधानाचा दुसरा अर्थ भारताने चीनच्या क्षेत्रात घुसखोरी केली, असा होता. भारताच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जाहीर विधानांमधून नेमकी हीच कबुली दिली आहे. भारतीय सैन्याकडूनच घुसखोरी करण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विधानांमधूनच स्पष्ट होते,’ असा अजब तर्क चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काढला आहे. चीन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मंगळवारी त्यांचे विधानदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

‘डोक्लाममधील परिस्थिती निवळावी, यासाठीचा उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे. भारताने या भागातून आपले सैन्य माघारी बोलवल्यास दोन्ही देशांमधील तणाव कमी होईल,’ असेदेखील चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले. सिक्किमच्या सीमेवर असणाऱ्या डोक्लाम भागात गेल्या महिन्याभरापासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये खडाजंगी सुरु आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवर असलेल्या डोक्लाममध्ये चीनकडून रस्त्याची निर्मिती केली जाते आहे. या रस्त्याच्या कामाला भारताने विरोध केला आहे. चीन आणि भूतानने डोक्लाम या वादग्रस्त जागेवर दावा केला आहे.