भारत आणि चीन या दोन्ही देशांचे ‘सख्खे शेजारी’ असणाऱ्या मध्य आशियाई देशांबाबत उभय देशांमध्ये चर्चेची एक फेरी मंगळवारी पार पडली. उभय देशांच्या शिष्टमंडळांदरम्यान ही चर्चा झाली. या भागातील देशांबाबत असलेल्या परस्परांच्या ‘समान दृष्टिकोना’वर या बैठकीत खल करण्यात आला, अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली.
भारत आणि चीन या दोघांच्याही परराष्ट्र धोरणांमध्ये मध्य आशियाई राष्ट्रांशी असलेल्या संबंधांना महत्त्वाचे स्थान आहे. हे लक्षात घेऊन, ऊर्जा, दहशतवादविरोध आणि प्रादेशिक सुरक्षितता या प्रमुख मुद्दय़ांभोवती उभय देशांमधील चर्चेची पहिली फेरी मंगळवारी पार पडली. अत्यंत सकारात्मक वातावरणात आणि समान उद्दिष्टांच्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली, असे भारतीय दूतावासाने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
चर्चेत नेमके काय झाले?
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मध्य आशियातील देशांशी असलेले आपले नाते आणि धोरण यांची माहिती दिली. तसेच या धोरणांचे राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावरील प्रभाव काय असू शकतात यावरही ऊहापोह करण्यात आला. इतिहासात प्रथमच उभय देशांमध्ये अशी चर्चा झाली असून, अफगाणिस्तानातून अमेरिकेने तसेच नाटो फौजांनी आपले सैन्य मागे घेतल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थिती-वरही चर्चा झाल्याचे स्पष्ट केले गेले.
 
चर्चेतील मुख्य मुद्दे :
* दहशतवाद विरोध
* प्रादेशिक सुरक्षितता
* शांघाय सहकार्य संघटना
* ऊर्जा प्रश्न
* विकासकामांसाठी संभाव्य भागीदारीक्षेत्रे

मध्य आशियाई राष्ट्रे :
कझाकिस्तान, किरघिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान. नव्या व्याख्येनुसार मध्य आशियाई देशांच्या यादीत पूर्व इराण, दक्षिण सैबेरिया, वायव्य पाकिस्तान, तिबेट आणि झेजियांग हे पश्चिम चीनमधील प्रांत, मंगोलिया या देशांचाही समावेश होतो.

चर्चेच्या नव्या फेऱ्यांचे बदलते केंद्रबिंदू
प्रादेशिक सुरक्षिततेच्या दृष्टीने उभी राहणारी आव्हाने लक्षात घेत आफ्रिका खंड, आखाती राष्ट्रे यांच्याबाबतही अशा फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सीमाप्रश्नावरून तापले गेले असतानाच दुसरीकडे हे संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न भारताकडून केला जात आहे, असेही प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या चर्चेची पुढील फेरी नवी दिल्लीत होणार आहे.