भारताने अग्नी क्षेपणास्त्रांचे परीक्षण केल्यापासून चीन आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचा उदय हा चीनच्या मार्गातील अडसर होणार नाही असे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले. याबरोबरच भारताच्या सार्वभौमत्वाचाही चीनने आदर करावा असा इशारा भारताने दिला आहे. चीन पाकिस्तानमध्ये खूप मोठी गुंतवणूक करीत आहे. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअर (सीपीइसी) या प्रकल्पामध्ये चीनची गुंतवणूक आहे. या प्रकल्पाचा काही मार्ग हा पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. पाकव्याप्त काश्मीरचा भूभाग वापरण्यावर भारताने कडाडून विरोध केला असल्याचे जयशंकर यांनी दिल्ली येथे झालेल्या रायसाना डायलॉगमध्ये म्हटले.

चीन हे एक जबाबदार राष्ट्र असून त्यांनी इतरांच्या सीमांचा आदर राखला पाहिजे, असे जयशंकर यांनी म्हटले. सीपीइसीचा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. हा भाग पाकिस्तानने बळकवलेला आहे. तेव्हा या भागातून मार्ग नेणे हे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. भारताला विश्वासात न घेता सीपीइसीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तेव्हा भारताने यावर चिंता प्रकट करणे स्वाभाविक आहे असे जयशंकर म्हणाले. हे प्रकरण चीनने संवेदनशीलतेने हाताळावे असे ते म्हणाले. भारताची संरक्षण क्षेत्रात प्रगती होत आहे. भारताची प्रगती चीनी माध्यमांना डोळ्यात खुपू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारताच्या प्रगतीकडे कानाडोळा करू नका असे चिनी माध्यमांनी तेथील सरकारला वेळोवेळी सांगितले आहे.

भारताच्या प्रगतीमुळे चीनला काहीही धोका नसल्याचे  असे जयशंकर यांनी म्हटले. जसा चीनच्या प्रगतीमुळे आम्हाला कुठलाही धोका झाला नाही तेव्हा आमच्या प्रगतीमुळे तुम्हाला धोका कसा निर्माण होईल असे त्यांनी म्हटले. एकमेकांच्या सीमांचा आणि हिताचा आदर केल्यावरच दोन्ही देशांची प्रगती होईल असे पंतप्रधान मोदींनी चीनला म्हटले होते. त्यानंतर परराष्ट्र सचिवांचे हे विधान आले आहे. भारत आपल्या सीमांबाबत कुठलीही तडजोडीची भूमिका स्वीकारणार नाही असा पवित्रा भारताने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनचे संबंध सुधारत चालले आहेत. व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात भारत आणि चीन हे भागीदार आहेत. काही मुद्दांवर दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. असे असले तरी एकमेकांच्या परस्पर सहकार्याने हे मतभेद मिटवता येऊ शकतात असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला आहे.