संरक्षण मंत्रालयाने पाच हजार कोटी रुपये खर्चून अमेरिकेकडून १४५ हलक्या हॉवित्झर तोफा आणि १८ धनुष तोफा खरेदी करण्यास शनिवारी मान्यता दिली. जवळपास तीन दशकांपूर्वी बोफोर्स घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रथमच लष्कराने शस्त्रे खरेदीला मान्यता दिली आहे.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन कौन्सिलच्या झालेल्या बैठकीत २८ हजार कोटी रुपयांच्या नव्या योजनांसह १८ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे १३ हजार ६०० कोटी रुपयांच्या क्षेपणास्त्र नौका उभारणीबाबत ‘बाय इंडियन’ वर्गवारीत निविदा जारी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

अमेरिकेकडून १४५ हॉवित्झर तोफा खरेदी करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असून त्याला मान्यता देण्यात आली, या तोफा भारतातच निर्माण केल्या जाणार असून त्यामुळे वाहतुकीच्या खर्चात बचत होणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या तोफा २५ कि.मी. अंतरावर मारा करण्याच्या क्षमतेच्या आहेत आणि त्यांच्या पुरवठय़ाच्या कालावधीतही कपात करण्यात आली आहे.

या तोफा खरेदी करण्यात भारताला स्वारस्य असल्याचे विनंतीपत्र अमेरिकेला पाठविण्यात आले होते आणि या तोफा अरुणाचल प्रदेश, लडाख येथे तैनात करण्यात येणार आहेत.

 

सोमालियातील हॉटेलवर हल्ला, ५ ठार ६ जखमी

मोगादिशू : अल-कायदाशी संलग्न असलेल्या शबाब दहशतवाद्यांनी मोगदिशूतील एका हॉटेलमध्ये केलेल्या हल्ल्यात किमान पाच जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे आणि अन्य सहा जण जखमी झाले आहेत, इतकीच माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.