आधीच आगमन लांबलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा बळीराजासह सर्वांचीच निराशा करण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार देशात यंदा सरासरीच्या ८८ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. केंद्रीय विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.
हवामान विभागाने यापूर्वी एप्रिलमध्ये वर्तविलेल्या अंदाज यंदा ९३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, त्यानंतर हवामानात झालेले बदल आणि त्याचा नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. या अंदाजानुसार देशाला यावर्षीही दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर दुष्काळी स्थिती समजण्यात येते. ८८ टक्क्यांच्या सुधारित अंदाजामध्ये हवामान विभागाने चार टक्क्यांची वाढ किंवा घट होण्याची शक्यताही गृहीत धरली आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या ९२ टक्के आणि ऑगस्टमध्ये सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. हे दोन्ही महिने शेती क्षेत्रासाठी महत्त्वाचे असतात.
मान्सून सामान्यतः एक जूनच्या सुमारास केरळच्या किनाऱयावर दाखल होतो. मात्र, यावेळी विविध कारणांनी त्याचे आगमन लांबणीवर पडले असून, हवामान विभागाने ५ जूनच्या सुमारास मान्सून केरळच्या किनाऱयावर दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे.