संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी पॅलेस्टिनी महिलेचा फोटो काश्मीरमधील पीडित म्हणून दाखवल्यानंतर भारतीय प्रतिनिधींनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या राजदूत पौलोमी त्रिपाठी यांनी दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आलेल्या लेफ्टनंट उमर फयाझचा फोटो संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेला दाखवत पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला. ‘हा फोटो खोटा नाही, तर खरा आहे. हा फोटो म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवादाचा चेहरा आहे,’ अशा स्पष्ट शब्दांमध्ये त्रिपाठी यांनी पाकिस्तानला सुनावले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत बोलताना पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी एका महिलेचा फोटो दाखवला होता. लोधी यांनी दाखवलेल्या फोटोतील महिलेच्या चेहऱ्यावर बंदुकीच्या छऱ्यांनी झालेल्या जखमांच्या खुणा होत्या. ‘काश्मीरमधील लोकांवर सुरु असलेल्या अत्याचारांचा हा पुरावा आहे,’ असे लोधींनी म्हटले होते. मात्र हा फोटो काश्मीरमधील नसून तो एका पॅलेस्टिनी महिलेचा असल्याचे भारतीय प्रतिनिधींनी स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तान तोंडघशी पडला.

‘पाकिस्तान दहशतवादाचे आंतरराष्ट्रीय केंद्र झाला आहे आणि यापासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत,’ अशा शब्दांमध्ये त्रिपाठींनी पाकिस्तानचे वाभाडे काढले. भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी पाकिस्तानकडून चुकीचा फोटो संयुक्त राष्ट्रसंघात दाखवण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्रिपाठी यांनी काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लेफ्टनंद उमर फयाझ यांचा फोटो सभागृहातील उपस्थितांना दाखवला. उमर फयाझ यांची काही महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण करुन अतिशय निर्घृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे कर्तव्य बजावत नसताना, एका लग्न समारंभातून अपहरण करुन फयाझ यांची हत्या करण्यात आली.

पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी दाखवलेला खोटा फोटो आणि उमर फयाझ यांचा खरा फोटो त्रिपाठींनी सभागृहाला दाखवला. ‘पाकिस्तानकडून किती यातना दिल्या जातात, याचे हे खरे चित्र आहे आणि हा फोटो खोटा नसून खरा आहे. जम्मू काश्मीरमधील तरुण लष्करी अधिकारी उमर फयाझचा हा फोटो आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी फयाझची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. मात्र पाकिस्तानच्या प्रतिनिधी कधीही यावर प्रकाश टाकणार नाहीत,’ अशा शब्दांमध्ये त्रिपाठींनी पाकिस्तानवर टीकेची झोड उठवली.