‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस’ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालामध्ये गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक शेजारील देशांपेक्षा कमी असल्याचं समोर आलं आहे. बांगलादेश, भुतान, श्रीलंका, चीन या देशांपेक्षा भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक खालावल्याचं दिसून येत आहे.

१९९०-२०१५ दरम्यानच्या कालावधीचा विचार करुन १९५ देशांच्या आरोग्य दराचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. या कालावधीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगतीपथावर असलेल्या भारत देशाला आरोग्याच्या बाबतीतील ध्येय गाठता न आल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या अहवालानुसार गेल्या २५ वर्षांमध्ये भारताच्या आरोग्य दरामध्ये १४.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९९० मध्ये ३०.७ टक्क्यांवर असलेला आरोग्य निर्देशांक २०१५ मध्ये ४४.८ टक्क्यांवर पोहोचला होता. पण, इतर आशियाई देशांचा आरोग्य सेवा निर्देशांक पाहता हे भारताची कामगिरी यथायथाच असल्याचं लक्षात येत आहे.

‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस’च्या अहवालात नमूद केल्यानुसार श्रीलंकेचा आरोग्यसेवा निर्देशांक ७२.८%, बांग्लादेशचा ५१.७%, भुतानचा ५२.७% आणि नेपाळचा ५०.८% टक्के इतका आहे. हृदयरोगाशी निगडीत विकारांवरील उपायांमध्ये भारत २५ व्या स्थानी आहे. तर, क्षयरोगाच्या उपचारांच्या बाबतीत भारत २६ व्या स्थानी आहे. मूत्रपिंडाशी निगडीत विकारांवरील उपायांच्या बाबतीत भारत २० व्या स्थानी आहे. यासोबतच इतरही विकारांवरील उपचारांच्या यादीतील भारताचं स्थान समोर आलं आहे. त्यात मधुमेह (३८ वं स्थान), अल्सरचे विकार (३९ वं स्थान) या विकारांवरील उपचार सेवा निर्देशांकाचाही समावेश आहे.

वाचा: कुपोषणमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर!

मुख्य म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही दोनच राष्ट्र आरोग्य सेवा निर्देशांकाच्या बाबतीत भारताच्या मागे आहेत. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस’च्या अहवालानुसार भारताचं स्थान इतक्या मागे येणं ही चिंताजनक बाब आहे. यातून बऱ्याच मुद्द्यांवर विचार करण्याची गरज असण्याचा मुद्दाही प्रकर्षाने समोर येत आहे.