अफगाणिस्तानमध्ये अपहरण करण्यात आलेल्या भारतीय पाद्रय़ाची आठ महिन्यांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मूळ तामिळनाडूतील असलेले आणि ‘जेसुईट रेफ्युजी सव्‍‌र्हिस’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेसाठी काम करणारे ख्रिस्ती पाद्री अ‍ॅलेक्सिस प्रेमकुमार (४७) यांचे पश्चिम अफगाणिस्तानातील हेरत प्रांतात गेल्या वर्षी २ जून रोजी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर केली. आपण प्रेमकुमार यांच्या वडिलांशी बोललो असून, त्यांची पुन्हा कुटुंबाशी भेट घडवून आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रेमकुमार यांच्या सुटकेसाठी पंतप्रधानांसह आपल्या नेतृत्वाने उच्च स्तरावर प्रयत्न केले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. त्यांच्या सुटकेसाठी गेले आठ  महिने अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.