पाकिस्तानने अवैधरित्या कब्जा केलेला काश्मीरचा भूभाग परत मिळवणे हा भारताचा अपूर्ण अजेंडा असल्याचे विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केले आहे. जितेंद्र सिंग हे पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडून आलेल्या सदस्यांसमोर भाषण करताना काश्मीर हा संयुक्त राष्ट्रांच्या पटलावरील मार्गी न लागलेला मुद्दा (unfinished agenda ) असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानाला जितेंद्र सिंग यांनी आज प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्याबाबतीत भारताचा एकमेव अपूर्ण अजेंडा आहे, तो म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरचा भूभाग परत मिळवणे, फाळणी होऊन ६८ वर्षांनंतरही हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे सिंग यांनी सांगितले. भारताचा दृष्टीकोन हा नेहमीच स्पष्ट आणि सातत्यपूर्ण राहिला आहे. पाकिस्तानने बळकावलेला जम्मू-काश्मीरचा भूभाग परत मिळवण्यासंबंधी १९९४ साली संसदेत एकमताने ठराव मंजूर झाला असल्याचेही सिंग यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरी जनतेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार असल्याचे सांगितले होते.
पाकिस्तानच्या ‘काळ्या दिवसा’ला भारतीय नेटिझन्सकडून असे उत्तर… 
काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांच्या चकमकीत ठार झालेला हिजबुलचा दहशतवादी बुरहान वानी याला ‘काश्मीरच्या स्वातंत्र्यलढय़ातील हुतात्मा’, असे घोषित करत १९ जुलै हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे जाहीर करत पाकिस्तानने शुक्रवारी भारताला डिवचले होते. दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या या आगळिकीला भारतानेही लगेचच प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी मंत्रिमंडळाने मंजूर केलेला ठराव हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ केल्यासारखेच असून हा ठराव आम्ही धुडकावून लावत असल्याचे परराष्ट्र खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न पाकिस्तानने तातडीने थांबवावे, असेही भारतातर्फे ठणकावण्यात आले होते.