पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतीकारक भगतसिंग यांना नमन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग यांचा आज ८६ वा स्मृतीदिन आहे. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या पवित्र स्मृतींना पंतप्रधान मोदींनी अभिवादन केले आहे. क्रांतीकारकांचे शौर्य आणि त्यांनी केलेला त्याग हा देश कधीही विसरु शकणार नाही, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांचा पराक्रम आणि त्याग अविस्मरणीय आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ब्रिटिश अधिकारी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सँडर्सची हत्या केल्याप्रकरणी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ब्रिटिश पोलीस सुपरिटेंडन्ट असलेल्या जेम्स स्कॉटचा खून करायचा होता. मात्र भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चुकून जॉन सँडर्सची हत्या केली. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय राय यांच्या मृत्यूमागे जेम्स स्कॉटचा हात असल्याची माहिती भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होती. त्यामुळेच जेम्स स्कॉटला यमसदनी धाडण्याचा निर्धार भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. मात्र त्यांच्याकडून चुकून जॉन सँडर्सची हत्या झाली. दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्बफेक करत असताना भगतसिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांना अटक झाली.

भगतसिंग यांनी तुरुंगात असताना उपोषण केले होते. ब्रिटिशांच्या कैदेत असणाऱ्या भारतीयांना चांगली वागणूक मिळावी, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी भगतसिंग यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. भगतसिंग यांना राजगुरु आणि सुखदेवसोबत २३ मार्चला फाशी देण्यात आली. तेव्हापासून २३ मार्च हा दिवस भगतसिंग यांची जन्मभूमी असलेल्या पंजाबमध्ये शहीद दिन म्हणून पाळला जातो.