ऑस्ट्रेलियामध्ये आज वर्णद्वेषातून एका भारतीयावर हल्ला झाला. हल्ला झालेली व्यक्ती ऑस्ट्रेलियामध्ये कॅबचालक म्हणून काम करत होती. कॅबमध्ये बसलेल्या ऑस्ट्रेलियन जोडप्याने या चालकाला मारहाण केली आहे. आणि भारतीय असल्यावरुन अपशब्दही वापरल्याचे एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. हल्ल्यात जखमी झाल्याने या भारतीयावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चालकाने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील तस्मानिया येथील मॅकडोनल्डपाशी एक जोडपे रात्री साडेदहाच्या सुमारास कॅबमध्ये बसले. गाडी चालू असताना मागे बसलेली महिला वारंवार गाडीचा दरवाजा उघडत होती. असे करु नको सांगितल्यावरही ही महिला ऐकत नव्हती. अशामुळे अपघात होऊ शकतो, असे सांगूनही या महिलेने चालकाचे ऐकले नाही. चालक वारंवार सूचना देत असल्याच्या कारणावरुन तीने चालकाला भारतीय असण्यावरुन अपशब्द वापरण्यास सुरुवात केली.
त्यानंतर गाडीत बसलेल्या जोडप्याने भारतीय अत्यंत वाईट भाषेत बोलण्यास सुरुवात केली. चालकाने गाडी थांबविल्यावर या दोघांनी मिळून चालकाला बेदम मारले. घडला प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला वाचविल्याचे चालकाने सांगितले.

यानंतर पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि मला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कऱण्यात आले. मी याबाबत पोलिसांना माहिती दिली असून त्यांनी या गोष्टीला गंभीरतेने घेतले नाही आणि गुन्हा दाखल करुन घेतला नाही. तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासणीसाठी घेतलेले नाही, अशी तक्रार या भारतीय कॅबचालकाने केली. याचवेळी एका प्रत्यक्षदर्शीने काढलेल्या व्हिडिओचे फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. परदेशात विविध वर्णद्वेषाच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहेत. यातच अशाप्रकारे भारतीय कॅबचालकावर झालेल्या या हल्ल्यामुळे या घटनांमध्ये भरच पडली आहे.