अमेरिकेच्या इराकवरील हवाई हल्ल्याच्या निषेधार्थ ‘इस्लामिक स्टेट’च्या जिहादी गटांनी अमेरिकी पत्रकार जेम्स फोली यांचा शिरच्छेद केल्याचा दावा केला आहे. दहशतवाद्यांनी याबाबतची चित्रफीत प्रसिद्ध केली आहे. फोली यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये सिरीयातून अपहरण करण्यात आले होते. फोली यांचा शिरच्छेद करणारा दहशतवादी मूळचा ब्रिटिश असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फोली यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सुटकेसाठी मोहीम चालवली होती. युद्धभूमीवरील वार्ताकनाचा अनुभव असलेले फोली यांनी यापूर्वी लिबियात वार्ताकन केले होते. त्यानंतर ग्लोबल पोस्ट, एएफपी आणि इतर संस्थांसाठी बशिर अल-असद यांच्या विरोधातील बंडाचे वार्ताकन करण्यासाठी ते सिरीयात गेले होते. सिरीयातून २२ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शोधण्याचे अनेक प्रयत्न करूनही ते निष्फळच ठरले. उत्तर इराकमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ल्यांचा आदेश अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिल्याने फोली यांचा शिरच्छेद केल्याचा दावा अतिरेक्यांनी केला आहे. मात्र ही घटना इराकमधील आहे की सिरीयातील, हे स्पष्ट झालेले नाही. एका मोकळ्या जागेत फोली यांना बसवून मागे बुरखाधारी व्यक्ती काही तरी संभाषण करत असल्याचे दृश्य आहे.
दरम्यान, फोली यांचा शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याची शैली ब्रिटिश असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. इराक आणि सिरीयामध्ये मूळ ब्रिटिश नागरिक असलेले सुमारे ४०० अतिरेकी आहेत. हे अतिरेकी तेथे ‘मदती’साठी गेलेले नसून प्रत्यक्ष युद्धात सहभागी होण्यासाठी गेले आहेत, अशी माहिती एका ब्रिटिश तज्ज्ञाने दिली. ब्रिटनचे पंतप्रधान फिलीप हॅमंड यांनी या घटनेचे वर्णन ‘भयानक’ या शब्दात केले आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आपली सुट्टी अर्धवट सोडून तातडीने लंडनला परतले आहेत.