सीमारेषेवर भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी कंठस्नान घातले आहे. तर कठुआ भागात एका घुसखोराला बीएसएफने अटक केली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सीमा रेषेवर पाकिस्तानमधून घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी रात्री जम्मू काश्मीरमधील परगवाल सेक्टरमध्ये भारतात घुसखोरी होत असल्याचे सतर्क जवानांच्या निदर्शनास आले. अंगावर चादर ओढून एक व्यक्ती भारतात घुसखोरी करत होता. जवानांनी त्याला थांबण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही तो व्यक्ती थांबला नाही. शेवटी जवानांनी त्याच्यावर गोळी झाडली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री अन्य एका घटनेत कठुआ सेक्टरमध्येही एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. अझहर असे या व्यक्तीचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याचे तपासात समोर आले आहे.

पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईजविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. सईदवरील कारवाईमुळे पाकिस्तानमधील दहशतवादी आता काही काळासाठी जम्मू काश्मीरमध्ये येऊन लपण्याची  शक्यता आहे. त्यामुळे सीमा रेषेवरील गस्त वाढवण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वीही सैन्याच्या जवानांनी राजौरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता. राजौरीमध्ये रात्रीच्या अंधारात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार दहशतवाद्यांवर जवानांनी कारवाई केली होती. या गोळीबारात तीन दहशतवादी पुन्हा पाकिस्तानमध्ये पळाले होते. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते.