जम्मू काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी बँक लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामामध्ये ही घटना घडली आहे. चार ते पाच दहशतवादी बंदुकांसह जम्मू ऍण्ड काश्मीर बँकेच्या शाखेत घुसले होते. या दहशतवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत १० लाख रुपये लुटले.

पुलवामा जिल्ह्यात अरिहल भागात जम्मू ऍण्ड काश्मीर बँकेची शाखा आहे. चार ते पाच दहशतवाद्यांनी या परिसरात गोळीबार करत बँकेत प्रवेश केला. या दहशतवाद्यांनी १० लाखांची रोकड घेऊन बँकेतून पळ काढला. सध्या या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातो आहे. बडगाम जिल्ह्यातील बँक शाखेतही दरोड्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे बडगाममधील शाखादेखील जम्मू ऍण्ड काश्मीर याच बँकेची होती. मात्र या बँकेमधील दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

याआधी गेल्या महिन्यात चोरट्यांनी सार्थल भागातील बँक शाखेत चोरी करुन ३४ लाख रुपये लंपास केले. याच चोरट्यांनी त्यानंतर नावापाची भागातील बँक शाखेत रात्री चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न निष्फळ ठरला. नोव्हेंबर महिन्यात जम्मू ऍण्ड काश्मीर बँकेच्या बडगाम शाखेत १२ लाखांची चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी लष्कर ए तय्यबाशी संबंधित लोकांना अटक केली होती.

देशभरात सध्या नोटाबंदीमुळे सामान्य माणसांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना एटीएम, बँकांसमोरील रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. काळा पैसा, भ्रष्टाचार यांना आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिन्याभरापूर्वी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. दहशतवाद्यांकडे असणारा पैसा नोटाबंदीमुळे कोणत्याही कामाचा राहणार नाही, असे ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या भाषणात मोदींनी म्हटले होते. मात्र दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील बँक लुटल्याने दहशतवाद्यांना आणि त्यांच्या कारवायांना नोटाबंदीमुळे लगाम बसला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर महिन्याभरात कोणताही फरक पडलेला नाही. दहशतवादी थेट बँकांच्या शाखांमध्ये घुसून रोकड लुटून नेत असल्याने नोटाबंदीच्या निर्णयाचा नेमका काय आणि किती फायदा झाला हे प्रश्न निर्माण झाले आहेत.  याशिवाय दहशतवादी काश्मीरमध्ये घुसून थेट बँकांपर्यंत पोहोचल्याने जम्मू आणि काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याआधी दोन हजार रुपयांची नवी नोट सरकारने जारी करताच ती दहशतवाद्यांकडे सापडली होती.