सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गुरूवारी पहाटेच्या सुमारास जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमधून घुसखोरी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना पिटाळून लावले. दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी जखमी झाला आहे. पाकिस्तानमधून घुसखोरी करत असलेल्या या दहशतवाद्यांनी सीमारेषेवर असलेल्या बीएसएफच्या चौकीवर गोळीबार सुरू केला. बीएसएफने दिलेल्या प्रत्युरात्तरामुळे अखेर या दहशतवाद्यांना पुन्हा पाकिस्तानातच पळ काढावा लागला. ही घटना गुरूवारी पहाटे १.५५ च्या सुमारास घडली.
सांबा सेक्टर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफची चौकी आहे. या सीमेजवळ पाकिस्तानच्या बाजूने सहा दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. या दहशतवाद्यांनी बीएसएफच्या चौकीवर बेसुमार गोळीबार सुरू केला. बीएसएफच्या जवानांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. यात एक दहशतवादी जखमी झाला. त्यामुळे गर्भगळीत झालेल्या इतर दहशतवाद्यांनी जखमी दहशतवाद्यास घेऊन पुन्हा पाकिस्तानकडे पळ काढण्यास भाग पाडले. त्याचदरम्यान पाकिस्तानी लष्करानेही भारतीय सीमेवर गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराने त्यांनाही प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी भारतीय जवानांनी सात दहशतवादी तळ नष्ट करण्याबरोबरच सुमारे ३९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानने मात्र भारताने सर्जिकल स्ट्राईक केले नसून त्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असल्याचा दावा केला होता.