तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने राज्यातील २८० लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अण्णाद्रमुक पक्षाने शनिवारी याबद्दलचे अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे जयललिलतांच्या निधनाच्या धक्क्याने मृत्यू झालेल्यांमध्ये चेन्नई, वेल्लोर, तिरूवेल्लोर, तिरूवन्नमलाली, कडलोर, कृष्णगिरी, थिरूवन्नामलई, इरोड आणि त्रिपूर येथील लोकांचा समावेश आहे. अण्णाद्रमुकने या लोकांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाने जाहीर केलेल्या निवदेनात ७७ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्यांनाही अशाचप्रकारची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती.

सलग दोनवेळा तामिळनाडूची सत्ता खेचून आणणाऱ्या जयललिता या जनमानसात प्रचंड लोकप्रिय होत्या. पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेकडून त्यांना ‘अम्मा’ या उपाधीने संबोधले जात असे. तामिळनाडूत सामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या योजनांमुळे जयललिता यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून जयललिता यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. अखेर ४ डिसेंबरला रात्री हदयविकाराचा झटका आल्यामुळे जयललिता यांचे निधन झाले होते. त्यानंतर संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाले होते. लोकांची जयललिता यांच्याशी भावनिकरित्या नाळ जुळली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. चेन्नईमधील अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही रोडावली होती. त्यामुळे शोकमग्न असलेल्या चेन्नईतील लोकांच्या मदतीला हैदराबादमधील तंत्रज्ञ धावून आले होते. चेन्नईला आवश्यक असणारे ४०% तंत्रज्ञान सहाय्य हैदराबादमधून दिले जाते आहे. तामिळनाडूतील लोकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यात हैदराबादमधील तंत्रज्ञ महत्त्वपूर्ण भूमिका महत्त्वाची बजावत आहेत. आणखी चार ते सात दिवस चेन्नईतील कंपन्यांना हैदराबादमधून तांत्रिक सहाय्य देण्यात येणार आहे. चेन्नईकरांच्या मनस्थितीसोबत चेन्नईतील राजकीय परिस्थितीदेखील पूर्वपदावर येण्यास आणखी काही अवधी जावा लागणार आहे.