पुढील वर्षांपासून निर्णयाची अंमलबजावणी

‘आयआयटी’सह देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा असलेली सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई-अ‍ॅडव्हान्स) पुढील वर्षांपासून (सन २०१८) पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय रविवारी झाला.

‘आयआयटी मद्रास’ येथे संयुक्त प्रवेश मंडळाची बैठक रविवारी झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष व आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर राममूर्ती यांनी या निर्णयाची माहिती नंतर पत्रकारांना दिली.

देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठीचा पहिला टप्पा असलेली ‘जेईई-मेन्स’ ही परीक्षा ऑनलाइन देण्याचा पर्याय याआधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता त्यापुढील टप्प्यावर असलेली ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन घेतली जाणार आहे.

यंदा ‘जेईई-मेन्स’ला सुमारे १३ लाख विद्यार्थी बसले होते. त्यातील जेमतेम १० टक्के विद्यार्थ्यांनीच त्यासाठी ऑनलाइनचा पर्याय स्वीकारला होता. या १३ लाखांतील सुमारे दोन लाख विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी पात्र ठरले. त्यांना पुढील वर्षी ही परीक्षा ऑनलाइन द्यावी लागेल.  ‘परीक्षा पद्धती अधिक पारदर्शी व्हावी, पेपरफुटीचा धोका टळावा आदी हेतू या ऑनलाइन परीक्षेमागे आहेत’, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे गुंतागुंतीचे स्वरूप लक्षात घेता त्यांची मांडणी करणे या ऑनलाइन प्रणालीद्वारे सोपे व्हावे, असेही एक उद्दिष्ट त्यामागे आहे. त्याखेरीज चुकीचे प्रश्न छापले जाण्याचा धोकाही त्यातून टळेल, अशी अटकळ आहे. ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. परीक्षा नेमकी कशी द्यायची, ऑनलाइन प्रणालीचा वापर कसा करायचा, याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.