सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कारवाया सुरुच असून जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. बुधवारी पाकिस्तानी जवांनांनी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतानेही पाकिस्तानी सैन्याला चोखप्रत्युत्तर दिले आहे.
बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पूंछ सेक्टरमध्ये सावियान या भारतीय चौकीवर पाकिस्तानी जवानांकडून गोळीबार करण्यात आला. यात छोटे शस्त्रास्त्र आणि मोर्टार शेल्सचा वापर करण्यात आला. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पूंछमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ६ सप्टेंबररोजी शहापूर येथील भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला होता.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले असतानाच शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची घटना घडली आहे. उरी येथील लष्करी छावणीवर पाकिस्तानमधन आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताने १९ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कणखर भूमिका घेतली आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरु असून याचे परिणाम इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क परिषदेवरही दिसून आले. भारताने बहिष्कार टाकल्यानंतर ही परिषद रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.  याशिवास सिंधू नदी पाणी वाटप करार आणि पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताने दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द करण्याची तयारीही नरेंद्र मोदींनी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे.