उत्तर कोरियाचा हल्ल्याचा इशारा

दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी कवायती उत्तर कोरियांच्या धमक्यांना न जुमानता सुरू झाल्या आहेत. उत्तर कोरियाने या कवायतींचा निषेध केला आहे. उलची फ्रीडम ड्रिल असे या कवायतींचे नामकरण केले असून त्यात उत्तर कोरियाकडून अणुहल्ला झाल्यास नेमकी कशी रणनीती असावी याचाही समावेश आहे. या कवायती संगणक सादृश्यीकरणाच्या माध्यमातील असून त्यात ५० हजार कोरियन व २५ हजार अमेरिकी सैनिक सहभागी आहेत. या दोन्ही देशांच्या कवायतीमुळे उत्तर कोरियात नेहमी संताप व्यक्त होत असतो. यावर्षी दोन देशांमध्ये सरहद्दीवरील तणाव वाढलेला असताना कवायती होत आहेत. अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायती संरक्षणात्मक पातळीवर असल्या तरी उत्तर कोरियाने मात्र त्या प्रक्षोभक असल्याचे म्हटले आहे.

उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने उलची फ्रीडम कवायतींचा निषेध करताना या गुन्हेगारी कृत्याला माफी नाही असे म्हटले आहे.कोरियन पीपल्स आर्मीने हल्ल्याचा इशारा दिला असून उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले तर कोरियन पद्धतीने अणुहल्ला करून राखेचे डोंगर करण्याचा इशाराही देण्यात आला.