जम्मू- काश्मीरमधील नौगाव सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात यश आले आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील नौगाव सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचे जवानांना आढळून आले. जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता, या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पण, या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून, एक जवान जखमी आहे.
नौगाव सेक्टरमध्ये बुधवारी घुसखोरी करण्याचा हदशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात आला होता. यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले होते. तर, एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. हा दहशतवादी लाहोरचा रहिवाशी असल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले होते.