हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीनुसार वयोवृद्ध आई आणि पत्नीला स्वतःसोबत राहू दिले पाहिजे. पंतप्रधानांचे निवासस्थान खूप मोठे आहे. मोदींनीह मन मोठे करुन आई – पत्नीला सोबत राहायला नेले पाहिजे असा सल्लाच अरविंद केजरीवाल यांनी मोदींना दिला आहे.

गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सकाळी लवकर उठून योगासन करण्याचे टाळून आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली. मोदींच्या या भेटीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये केजरीवाल म्हणतात, हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृतीनुसार वयोवृद्ध आई आणि पत्नीला सोबतच ठेवले पाहिजे. पंतप्रधानांचे निवासस्थान  मोठे असून मोदींनी मनही मोठे करावे असे त्यांनी म्हटले आहे. या ट्विटच्या माध्यमातून केजरीवाल यांनी मोदींना आई आणि पत्नीला सोबत राहायला नेण्याचा सल्लाच दिला. आणखी एका ट्विटमध्ये केजरीवाल म्हणाले, मी आपल्या आईसोबत राहतो, रोज त्यांचा आशीर्वाद घेतो. पण मी त्याचा गवगवा करत नाही. मी माझ्या आईला राजकारणासाठी बँकेच्या रांगेत उभे करत नाही असे केजरीवाल यांनी नमूद केले.

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. त्यावेळीही केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी मुक्कामास आहेत. तर त्यांच्या मातोश्री मेहसणा येथे भावासोबत राहतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून मेहसाणा येथे त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.