नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आणीबाणी लागू केली असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आम आदमी पक्षाचे ( आप) आमदार दिनेश मोहनिया यांना दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विटवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांनी मोहनिया यांना भर पत्रकारपरिषदेतून ताब्यात घेतले. त्यामुळे संतापलेल्या अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मोदी यांनी दिल्लीत आणीबाणी लागू केली आहे. दिल्लीच्या जनतेने निवडून दिलेल्यांविरुद्ध अटक, छापे, धमक्या आणि खोटे-नाटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. दिनेश मोहनिया यांना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर अटक करण्यात आली. या सगळ्यातून मोदी सरकार काय संदेश देऊ पाहत आहे, असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला.
दिनेश मोहनिया हे दिल्ली जल प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आहेत. मतदासंघातील वृद्ध महिलेशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना आज ताब्यात घेतले. मोहनिया हे फेब्रुवारी २०१५ मध्ये दिल्लीत ‘आप’ सरकार सत्तेत आल्यापासून अटक करण्यात आलेले सत्ताधारी पक्षाचे आठवे आमदार आहेत.