केरळमधील काँग्रेस आमदाराने ५१ वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आमदार एम विन्सेटला अटक केली असून अटकेच्या कारवाईनंतर विन्सेट राजीनामा देण्याची शक्यता आहेत.

तिरुअनंतपूरममधील बलरामपूरम येथे राहणाऱ्या ५१ वर्षांच्या गृहिणीने बुधवारी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेच्या पतीला हा प्रकार लक्षात येताच त्याने पत्नीला रुग्णालयात दाखल केले. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात आमदार एम विन्सेटने बलात्कार केल्याचे म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून विन्सेट माझा लैंगिक छळ करत होता. माझा पाठलाग करत होता. या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असे महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले. विन्सेटने माझा मानसिक छळ केला. त्याने दोन वेळा सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केले अशी तक्रार महिलेने केली होती.

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शनिवारी विन्सेटची कसून चौकशी केली. दोन तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. विन्सेटने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने त्याच्या अडचणी वाढल्या होत्या. काँग्रेसमधील वरिष्ठ महिला नेत्यांनीदेखील विन्सेटने राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असे मत मांडले होते. अटकेनंतर विन्सेट राजीनामा देतील अशी शक्यता आहे. विन्सेट यांनी बलात्काराचे आरोप फेटाळून लावले होते. माझा बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंध नसून माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.