भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशी रद्द करण्यासाठी त्यांच्या आईने पाकिस्तानी न्यायालयात धाव घेतली आहे. कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करण्यासाठी भारतीय दूतवासाकडून कुलभूषण यांच्या आई अवंती जाधव यांच्या नावाने पाकिस्तानच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

कुलभूषण जाधव यांच्यासोबत संपर्क साधता यावा, यासाठी भारताकडून १६ व्यांदा कॉन्स्युलर अॅक्सेससाठी अपील करण्यात आले आहे. भारताकडून कॉन्स्युलर अॅक्सेससाठी करण्यात आलेली १५ अपील आतापर्यंत पाकिस्तानकडून रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानचे राजदूत अब्दुत बासित यांनी ‘भारत आणि पाकिस्तानमधील २००८ च्या कराराद्वारे फक्त सामान्य कैदी आणि मच्छिमारांसाठीच कॉन्स्युलर अॅक्सेस दिला जातो. कुलभूषण जाधव हे भारताचे हेर असल्याने त्यांना कॉन्स्युलर अॅक्सेस दिसा जाऊ शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात कॉन्स्युलर अॅक्सेसची मागणी फेटाळली आहे’ असे सोमवारी म्हटले होते.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान आणि कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावतेवेळीची न्यायालयीन कागदपत्रे, पुराव्यांची माहिती, वैद्यकीय अहवालांची मागणी भारताकडून करण्यात आली आहे. यासोबतच जाधव यांच्या बचावासाठी एक वकील पुरवण्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानाचा विसा देण्याची मागणीदेखील भारताकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतीय नौदलाचे माजी कर्मचारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कुलभूषण जाधव यांना मागील वर्षी ३ मार्चला पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने बलुचिस्तानमधून अटक केली. भारताची गुप्तहेर संघटना असलेल्या ‘रॉ’साठी काम करत असल्याचा ठपका पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवला. मात्र भारताने पाकिस्तानच्या आरोपांचा इन्कार केला आहे. जाधव भारतीय नौदलात काम करत होते. मात्र ते निवृत्त अधिकारी असून आता त्यांचा भारत सरकारशी संबंध नाही. ते फक्त भारतीय नागरिक आहेत, अशी भूमिका भारत सरकारने घेतली आहे.