जम्मू-काश्मीरमधील कुपवाड्यात लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत लष्करानेही दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पण कुपवाड्यातील या दहशतवादी हल्ल्यानंतर पुढील काळात आणखी काही हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहशतवाद्यांकडून लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे गेल्या काही काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतून लक्षात येते. गेल्या तीन वर्षांत लष्कराच्या तळांवर तब्बल सहा दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यात २२ अतिरेक्यांना लष्कराच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. संरक्षण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांत सीमारेषेवरील घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०१७ पर्यंत जम्मू – काश्मीरमध्ये घुसखोरीच्या १२७ घटना समोर आल्या आहेत. त्यात २०१६ मध्ये ८८ वेळा दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. तर गेल्या पंधरा महिन्यांत शंभराहून अधिक वेळा दहशतवादी कारवायांच्या घटना घडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत लष्करावर तब्बल ३८ दहशतवादी हल्ले झाले आहेत. देशभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत सीमारेषेवर तैनात असलेले, तसेच सुरक्षा दलाच्या कारवायांमध्ये सहभागी झालेले लष्कराचे १५६ जवान शहीद झाले आहेत. त्यात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत शहीद झालेल्या जवानांची संख्या अधिक आहे. तर २०१६ मध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना ९ जवानांना वीरमरण आले आहे. तर इतर भागांत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना ४० जवान शहीद झाले आहेत. दरम्यान पाकिस्तानमधून घुसखोरी होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरपर्यंत घुसखोरीच्या ६१९ घटना घडल्या आहेत. त्यात १२७ घुसखोरांना कंठस्नान घातले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी सक्रिय

उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यात लष्कराचे १५ जवान शहीद झाले होते. तर चार दहशतवादी ठार झाले होते. यानंतर नोव्हेंबरमध्ये शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत दहशतवादी हल्ल्याच्या वाढत्या घटनांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल २०० दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती सरकारने दिली होती.
> जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळांवर झालेले हल्ले

– २७ नोव्हेंबर २०१४ रोजी कठारमध्ये झालेल्या हल्ल्यात चार दहशतवादी ठार झाले.

– ५ डिसेंबर २०१४ रोजी महोरा येथील हल्ल्यात सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

– २१ मार्च २०१५ रोजी संबा येथे हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले

– २५ नोव्हेंबर २०१५ रोजी तंगधर येथील हल्ल्यात तीन दहशतवाद्यांना ठार मारले.

– १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथे झालेल्या हल्ल्यात चार दहशतवादी ठार

– २९ नोव्हेंबर २०१६ रोजी नागरोटा येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यात लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.