मेक्सिकोच्या एका सॉफ्टवेअर कंपनीने ऑडिओ, व्हिडिओ पाठवण्यासाठी लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करून सेकंदाला १० गिगाबाईट्सचा वेग साध्य करण्यात यश मिळवले आहे. लाय-फाय तंत्रज्ञानात एलइडी दिव्यांच्या मदतीने जो प्रकाश पडतो त्याच्या वर्णपंक्तीचा वापर माहिती पाठवण्यासाठी केला जातो. एखाद्या मोठय़ा कार्यालयात एकाच वेळी एलइडी दिव्यांचा झगमगाट व तेथील प्रत्येक यंत्राला या दिव्यांच्या प्रकाशामुळे पूर्ण इंटरनेट सेवा उपलब्ध करून देता येणार आहे.
लाय-फाय म्हणजे लाइट फिडेलिटी हे तंत्रज्ञान यापूर्वीही वापरण्यात आले आहे, पण एवढा वेग साध्य करता आला नव्हता. वाय फाय तंत्रज्ञानाला अतिशय चांगला पर्याय म्हणून लाय-फाय तंत्रज्ञान ओळखले जाते, कारण त्यामुळे इंटरनेटचा वेग तर वाढतोच शिवाय तुमची माहिती सुरक्षितपणे पाठवता येते. माहिती पाठवण्याचा वेग सेकंदाला १० गिगाबाईट्स इतका साध्य करण्यात आला आहे. लाय-फाय आधारित यंत्र एलइडीच्या माध्यमातून माणसाच्या डोळय़ांनाही चकवेल इतक्या वेगाने माहिती पाठवू शकते. मेक्सिकोच्या सिसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अरतुरो कॅम्पोस फेनटानेस यांनी सांगितले, की वाय-फायमध्ये केबल्सचा वापर केलेला असतो, लाय-फाय तंत्रज्ञानाचा खूप तीव्रतेचा प्रकाश माहिती पाठवण्यासाठी वापरला जातो. वाय-फायच्या तुलनेत लाय-फायचा आणखी एक फायदा असा, की यात संदेश हॅक करता येत नाही कारण प्रकाश चोरता येत नाही व प्रकाश हेच येथे माहितीच्या वहनाचे साधन आहे. यामध्ये प्रकाश हा अँटेना असतो व दुसऱ्या यंत्राला प्रकाशीय संदेश ग्रहण करणारा संग्राहक असावा लागतो. दृश्यप्रकाश संदेशवहन (व्हीएलसी) नावानेही लाय-फाय तंत्रज्ञान ओळखले जाते. त्यात अ‍ॅटोनामस इन्स्टिटय़ूट ऑफ मेक्सिको येथे सेकंदाला दोन गिगॅबाईट इतका माहिती पाठवण्याचा वेग प्रथम साध्य करण्यात आला व नंतर तो पाच पटींनी वाढवण्यात आला.

चित्रपट ४५ सेकंदांत डाऊनलोड
रुग्णालयासारख्या प्रारणे वापरणाऱ्या ठिकाणी लाय-फायचा वापर करता येतो. प्रारणांमुळे साध्या इंटरनेटच्या संदेशात अडथळे येतात तसे यात येत नाहीत असे फेनटानेस यांचे म्हणणे आहे. सध्या मेक्सिकोत माहिती इंटरनेटवरून पाठवण्याचा कमाल वेग सेकंदाला २०० मेगाबाईट असून लाय-फाय इंटरनेटच्या वेगाची कल्पना यावी म्हणून उदाहरणच द्यायचे झाले तर एचडी चित्रपटाची सीडी यात ४५ सेकंदांत डाऊनलोड होते.