नोटाबंदीच्या मुद्द्यावर सरकार कधीही चर्चेसाठी तयार आहे. मात्र, मला लोकसभेत बोलू दिले जात नाही. त्यामुळे मी थेट जनतेसमोर येऊन बोलण्याचा पर्याय निवडल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते शनिवारी गुजरातच्या दिसा येथे जाहीर सभेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मोदी यांनी ५० दिवसानंतर परिस्थिती निश्चितपणे सुधारण्यास सुरूवात होईल, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या ७० वर्षांपासून देशातील प्रामाणिक लोकांना तुम्ही लुटले, त्यांना त्रास दिला, त्यांचे जगणे मुश्किल केले. मात्र, आता जेव्हा मी या लोकांच्या बाजूने उभा राहिलो आहे, तेव्हा त्यांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तरीही जनतेने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, त्यासाठी मी जनतेचे आभार मानतो , असे मोदी यांनी सांगितले.  या जाहीर सभेत शेतकऱ्यांना संबोधित करण्यापूर्वी मोदी येथील काही सार्वजनिक उपक्रमांचे उद्घाटन  केले.

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही गुजरातमधील पहिलीच जाहीर सभा होती. त्यामुळे या सभेत मोदी कोणता नवा मुद्दा मांडणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. हा निर्णय देशाला आणि गरीब जनतेला सक्षम करणारा आहे. दहशतवाद्यांना बनावट नोटांमुळे मदत मिळते आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागतो. त्याचमुळे दहशततवाद, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांचा कारबार रोखण्यासाठी ५०० व १००० हजार रुपयांच्यया जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मी सुरूवातीलाच त्रास सहन करावा लागेल, असे सांगितले होते. मी म्हटल्याप्रमाणे ५० दिवसांनंतर परिस्थिती निश्चितपणे सुधारेल, असे मोदींनी सांगितले. काही लोक मला सत्तेवरून हटविण्याच्या बाता मारत असतात. नोटाबंदीच्या निर्णयाचे परिणाम दूरगामी आहेत, तेव्हा आम्हाला त्याचा काय फायदा, असा बुरसटलेला प्रश्न उपस्थित करतात. मात्र, आपला देश हा फक्त स्वत:पुरता विचार करणा-यांचा , स्वार्थी लोकांचा देश नसून, देशातील लोक पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करणारे आहेत,  असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर देशभरात अभूतपूर्व चलनटंचाई निर्माण झाली होती. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी आणि मजूर वर्गाला दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या वर्षी देशभरात चांगला पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळण्याची शक्यता होती. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाने या सर्व शक्यतांवर पाणी फेरले होते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामातील पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणणार, हा प्रश्न उभा ठाकला होता. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना जनतेकडे ५० दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, महिना उलटूनही चलनटंचाईच्या परिस्थितीत फारसा फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे आणखी किती काळ त्रास सहन करायचा, असा प्रश्न सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती नवी भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यावेळी सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. या सभेत त्यांनी गुजरातमधील शेतकऱ्यांचे भरभरून कौतुक केले.

Live Updates
12:31 (IST) 10 Dec 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची सांगता
12:28 (IST) 10 Dec 2016
ही लढाई देशाचे भाग्य बदलण्यासाठी - मोदी
12:27 (IST) 10 Dec 2016
तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग व्यवहार सुलभ झाले आहेत, हे लोकांना दाखवा- मोदी
12:27 (IST) 10 Dec 2016
बँकेच्या रांगेत उभे राहणारे लोक दाखवा, मात्र सकारात्मक परिणामही दाखवा- मोदी
12:25 (IST) 10 Dec 2016
मोदींवर टीका करणे तुमचा हक्क आहे- मोदी
12:24 (IST) 10 Dec 2016
मी जनतेशी थेट संवाद साधण्याचा मार्ग निवडला आहे- मोदी
12:23 (IST) 10 Dec 2016
मला विरोध करा, मात्र गरीब लोकांसाठीही काम करा- मोदी
12:20 (IST) 10 Dec 2016
प्रामाणिक लोक स्वत:साठी नव्हे तर देशासाठी उभे राहतात- मोदी
12:19 (IST) 10 Dec 2016
५० दिवसानंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल - मोदी
12:18 (IST) 10 Dec 2016
मी आधीच सांगितलेले खूप त्रास सहन करावा लागेल- मोदी
12:18 (IST) 10 Dec 2016
गरीबांसाठी केवळ बोलणे सोपे, पण त्यांच्या भल्यासाठी समर्पक वृत्तीने कठोर निर्णय लागू करणे अवघड- मोदी
12:16 (IST) 10 Dec 2016
संसदेतील गोंधळाबद्दल राष्ट्रपतीही नाखूश- मोदी
12:16 (IST) 10 Dec 2016
मला संधी मिळेल तेव्हा मी लोकसभेत १२५ कोटी जनतेचा आवाज पोहचवेन- मोदी
12:15 (IST) 10 Dec 2016
मला संसदेत बोलू दिले जात नाही- मोदी
12:12 (IST) 10 Dec 2016
माझ्या देशातील लोक पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करणारे- मोदी
12:12 (IST) 10 Dec 2016
माझा लोक स्वार्थी लोकांचा देश नाही- मोदी
12:12 (IST) 10 Dec 2016
काही लोक मला सत्तेवरून हटविण्याच्या बाता मारतात- मोदी
12:10 (IST) 10 Dec 2016
देशातील प्रामाणिक जनता माझ्या पाठिशी उभी राहिल्याबद्दल आभार- मोदी
12:10 (IST) 10 Dec 2016
मात्र, प्रामाणिक जनता माझ्या पाठिशी उभी राहिली - मोदी
12:10 (IST) 10 Dec 2016
तुम्ही ७० वर्षे देशातील प्रामाणिक लोकांना लुटले, मी त्यांच्या बाजूने उभा राहिलो तर त्यांना भडकवले जात आहे- मोदी
12:09 (IST) 10 Dec 2016
नोटीबंदीचा निर्णय देशाला सक्षम करण्यासाठी- मोदी
12:08 (IST) 10 Dec 2016
दहशतवाद्यांना बनावट नोटांमुळे मदत मिळते- मोदी
12:08 (IST) 10 Dec 2016
नोटाबंदी हा सध्या देशभरात चर्चेचा विषय - मोदी
12:08 (IST) 10 Dec 2016
नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींची गुजरातमधील पहिलीच जाहीर सभा
12:02 (IST) 10 Dec 2016
कच्छ आणि बनासकंठामधील नागरिक रोजगारासाठी इतरत्र जात होते. आज तशी स्थिती नाही- मोदी
12:01 (IST) 10 Dec 2016
मी तुमच्यासमोर पंतप्रधान म्हणून नव्हे तर या भूमीचा सुपूत्र म्हणून उभा आहे
12:01 (IST) 10 Dec 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात
10:46 (IST) 10 Dec 2016
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात काळ्या रंगाचे कपडे बदलण्याची पोलिसांची नागरिकांना सूचना
10:45 (IST) 10 Dec 2016
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात काळे कपडे, जॅकेट घालून येणाऱ्यांस पोलिसांचा मज्जाव.