विद्यार्थ्याच्या गालाला चिमटा काढल्याची शिक्षा म्हणून मद्रास उच्च न्यायालयाने गुरूवारी एका शिक्षिकेला ५०,००० रूपयांचा दंड ठोठावला आहे. न्या. संजीव किशन कौल आणि न्या. एम. सत्यनारायणन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. सन २००६ मध्ये चेन्नईच्या मैलापूर केसरी उच्च माध्यमिक शाळेतील रमा गोवरी या शिक्षिकेने गृहपाठ न केल्यामुळे सातवी इयत्तेतील विद्यार्थ्याच्या गालावर चिमटा काढला होता. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या गालाला लहानशी दुखापत झाली होती. या मुलाच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने याविरुद्ध राज्य मानवी आयोगाकडे तक्रार दाखल केली. मात्र, आपण त्या मुलाचा फक्त कानच पिळला होता. यावेळी कान सोडवून घेण्यासाठी धडपड करताना संबंधित विद्यार्थ्याच्या गालाला दुखापत झाल्याचे स्पष्टीकरण शिक्षिकेने आयोगासमोर दिले होते. त्यानंतर प्रक्रियेचे अनेक सोपस्कार पार पडल्यानंतर या शिक्षिकेविरोधात गुन्ह्याचा खटला दाखल करण्यात आला. यासंबंधी आयोगाने २०१३मध्ये मैलापूर शाळेलाही १००० रूपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, या कारवाईवर असंतुष्ट असलेल्या विद्यार्थ्याच्या आईने नुकसान भरपाई वाढवून देण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले. दरम्यान, संबंधित शिक्षिकेनेही याप्रकरणात आपल्याला जाणूनबुजून त्रास दिला जात असून, न्यायालयाकडे मदतीची याचना केली होती. यासंदर्भात निकाल देताना न्यायालयाने आज निकालाची घोषणा केली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2014 रोजी प्रकाशित
गालाला चिमटा काढल्याबद्दल ५० हजारांचा दंड!
विद्यार्थ्याच्या गालाला चिमटा काढल्याची शिक्षा म्हणून मद्रास उच्च न्यायालयाने गुरूवारी एका शिक्षिकेला ५०,००० रूपयांचा दंड ठोठावला आहे. न्या. संजीव किशन कौल आणि न्या. एम. सत्यनारायणन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
First published on: 30-10-2014 at 03:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madras hc fines school teacher rs 50000 for pinching students cheek