५२ प्रवासी जखमी; रेल्वेचे चौकशीचे आदेश

माहोबा जिल्ह्य़ांत गुरुवारी पहाटे जबलपूर-निझामुद्दीन महाकौशल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातांत ५२ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी १० जण गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेमुळे ४०० मीटर लांबीच्या रुळांचे नुकसान झाले असून प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघातामुळे सदर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून १४ गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लखनऊमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) दलजित चौधरी यांनी सांगितले की, मध्यरात्री २.२० मिनिटांनी ही दुर्घटना घडली, त्यामध्ये ५२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांचा अस्थिभंग झाला आहे, त्यांना झाशीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमींपैकी काहींवर प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले, तर काही जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. माहोबा आणि कुलपहाड रेल्वेस्थानकांदरम्यान सुपा गावाजवळ हा अपघात घडला.

सदर अपघातांत प्रथमदर्शनी काहीही संशयास्पद आढळले नाही, मात्र ही गंभीर बाब असल्याने सर्व अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. रेल्वे अधिकारी आणि दहशतवादविरोधी व एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली असून अपघात कोणत्या कारणामुळे झाला त्याची चौकशी सुरू आहे, असे चौधरी म्हणाले.

उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची, तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.