चौकशी आयोग नेमण्याची मागणी

महात्मा गांधी यांचा आणखी एक मारेकरी होता काय, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील एका जनहित याचिकेत विचारण्यात आला आहे.

गांधीजींवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असे पोलीस मानत असले, तरी नथुराम गोडसेशिवाय आणखी कुणी चौथी गोळीही झाडली होती काय? – यासारखे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येमागील व्यापक कारस्थान उघड करण्याची आवश्यकता असून त्यासाठी नवा चौकशी आयोग स्थापन केला जावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

गांधीजींची हत्या हे इतिहासातील दडपण्यात आलेले एक मोठे प्रकरण होते काय, आणि त्यांच्या मृत्यूसाठी विनायक दामोदर सावरकर यांना दोषी ठरवण्याचा काही आधार होता काय, असे प्रश्न विचारून, गांधीहत्येच्या तपासावर याचिकेत प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे.

चौकशी आयोगाच्या तपासावर प्रश्नचिन्ह

गांधीहत्येच्या चौकशीसाठी १९६६ साली स्थापन करण्यात आलेला न्या. जे.एल. कपूर चौकशी आयोग या हत्येमागील संपूर्ण कारस्थान उघडकीस आणू शकला नाही, असे मुंबईच्या अभिनव भारत संघटनेचे विश्वस्त आणि संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी केलेल्या या जनहित याचिकेत म्हटले आहे.