विशाखापट्टणममधील विशेष आर्थिक क्षेत्रातील जैव-डिझेल उत्पादन कंपनीमध्ये मंगळवारी सायंकाळी मोठी आग लागली असून अद्यापही ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बाबत विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी एन. युवराज यांनी सांगितले की, नौदल, विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आणि पोर्ट ट्रस्टचे ४० अग्निशामक बंब आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. येथील दुव्वादा परिसरातील बायोक्समॅक्स फ्युएल्स लि. कंपनीच्या संकुलात मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली. या आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. कंपनीच्या गोदामात ही आग लागली तेव्हा एकही कामगार तेथे नव्हता. सदर कंपनीची पाच लाख टन जैव-डिझेल उत्पादनाची क्षमता आहे. कंपनीच्या एकूण १८ साठवणूक टाक्यांपैकी १२ टाक्यांना आग लागली, लवकरच ही आग आटोक्यात येईल. कारण टाक्यांमधील तेल संपूर्ण जळणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.