परिस्थिती कशी हाताळायची हे लष्करालाच ठरवू द्या अशा शब्दात संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी टीकाकारांना सुनावले आहे. परिस्थिती कशी हाताळावी यासाठी लष्कराला संसदेतील खासदारांचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मेजर नितीन गोगोई यांच्यावरुन वाद निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी लष्कराने एका तरुणाला जीपसमोर बांधल्याचा प्रकार समोर आला होता. मेजर गोगोई यांनीच हा निर्णय घेतला होता. मी तरुणाला जीपला बांधले नसते तर अनेकांचा जीव गेला असता असे सांगत गोगोईंनी त्यांच्या कृत्याचे समर्थन केले होते. १२०० जणांच्या जमावाने आम्हाला घेरले होते. गोळीबार केला असता तर अनेकांचा जीव गेला असता आणि परिस्थिती चिघळली असती. म्हणूनच तरुणाला जीपला बांधण्याचा विचार माझ्या डोक्यात आला आणि त्याला जीपला बांधल्यावर जमाव मागे हटल्याचे गोगोईंनी म्हटले होते. दुसरीकडे मेजर गोगोई यांना लष्कराने प्रशंसापत्राने सन्मानित केले होते. यावरुनही वाद निर्माण झाला होता. ओमर अब्दुल्लांपासून विविध नेत्यांनी यावर टीका केली होती.

मेजर गोगोई यांच्यावरुन सुरु असलेल्या वादावर संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी टीकाकारांना सुनावले. लष्करी प्रकरणांमध्ये नेत्यांनी नव्हे तर लष्कराच्या अधिकाऱ्यांनीच तोडगा काढला पाहिजे. लष्कराला परिस्थिती कशी हाताळायची याबाबत निर्णय घेताना संसदेत बसलेल्या खासदारांचा सल्ला घेण्याची गरज नाही असे जेटलींनी म्हणाले.

बुधवारी अरुण जेटली यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. आसाममध्ये एम्स रुग्णालय तसेच २५ वर्ष जूने परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (एफआयपीबी) बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला.