मेजर गोगोई यांच्या कृत्याचे लष्करप्रमुखांकडून समर्थन

काश्मिरात सध्या छुप्या युद्धाच्या नावाखाली लष्कराला एका गलिच्छ अशा युद्धाला सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारच्या युद्धाचा सामना करण्यासाठी लष्कराला अभिनव मार्गाचा अवलंब करावा लागतो, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दगडफेक करणाऱ्या जमावापासून बचाव करण्यासाठी मानवी ढालीचा वापर करणाऱ्या मेजर लितुल गोगोई यांच्या कृत्याचे समर्थन केले. गोगोई यांनी केलेल्या या कृत्याची चौकशी सुरू असताना त्यांना सन्मानित करण्यामागे लष्कराचे मनोबल उंचावणे हाच हेतू होता, असे सांगत कठीण परिस्थितीत जवान लढत असताना मी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे लष्करप्रमुख म्हणाले.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत लष्करप्रमुख रावत यांनी काश्मिरातील सद्यस्थितीतबाबत परखड भाष्य केले. ते म्हणाले, ‘काश्मीर खोऱ्यात सध्या प्रचंड प्रमाणात हिंसक कारवाया होत आहेत. जमाव आमच्यावर दगडफेक करतो. वस्तुत या लोकांनी आमच्यावर दगडफेक करण्याऐवजी शस्त्रे चालवली तर मला जास्त आनंद होईल. कारण त्यामुळे आम्हाला जे करायचे आहे, ते करता येईल. खोऱ्यातील जनता आमच्या जवानांवर दगडफेक करते, पेट्रोबॉम्बचा वर्षांव करते. अशावेळी माझ्या जवानांनी काय करू, असे विचारले तर मी त्यांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही. तुमच्यासाठी शवपेटय़ा तयार करून ठेवल्या आहेत, त्यात तुमचे मृतदेह फुलांनी सजवून तुमच्या मूळ गावी पाठवेन, असे मी त्यांना सांगू का? लष्करप्रमुख म्हणून मला माझ्या माणसांचे मनोबल उंचवण्यासाठी आवश्यक ते सर्व करणे भागच आहे.’ घुसखोरी व सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया थांबवल्या गेल्याच हव्यात. सुटीवर असलेला तरुण लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फय्याज दहशतवाद्यांकडून मारला जातो, तेव्हा लोक आवाज का उठवत नाहीत असा सवालही लष्करप्रमुखांनी केला. काश्मीरसंदर्भातील राजकीय तोडग्याबाबत विचारले असता, ‘हा सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. अशा उपाययोजना यापूर्वीही झाल्या. परंतु त्याची परिणती कारगिलच्या युद्धात झाली’, असे रावत म्हणाले. पाकिस्तानशी मर्यादित युद्ध अपेक्षित नसल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.

लष्करप्रमुख म्हणाले..

  • ’एखाद्या देशातील लोकांना लष्कराचा धाक राहिला नाही तर तो देश दुर्दैवीच म्हणायला हवा
  • ’तुमच्या वैऱ्याने तर तुम्हाला घाबरायला हवेच शिवाय तुमच्या लोकांवरही तुमचा धाक असायला हवा
  • ’आम्ही लोकांसमोर मैत्रीचा हात पुढे करतो. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येतो त्यावेळी लोकांनी आम्हाला घाबरायलाच हवे
  • ’काश्मीर खोऱ्यातील स्थिती हाताळताना लष्कराने बराच संयम दाखवला आहे
  • ’युद्धभूमीपासून मी दूर आहे. मात्र माझ्या जवानांना मी त्यांच्याबरोबर आहे एवढे सांगू शकतो
  • ’त्यांनी काही चुकीचे केले तरी त्याची जबाबदारी माझ्यावर आहे

सुरक्षा दलांमध्ये असलेल्या विश्वासाच्या वातावरणाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न होत आहेत. एखाद्या ठिकाणी लष्कराची गरज आहे आणि त्यास प्रतिसाद दिला नाही तर लोकांचा व पोलिसांचा आमच्यावरील विश्वास उडेल. हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.  – बिपीन रावत, लष्करप्रमुख