दहशतवादाच्या वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी मलेशिया सरकारने नवा विशिष्ट कायदा करण्याचे ठरविले आहे. दहशतवादी गटाची विचारसरणी देशात पसरविण्यासाठी इसिसचे काही दहशतवादी पुन्हा मायदेशी परतले असल्याचे वृत्त आल्याने नवा कायदा करण्यात येत आहे.
‘टॅकलिंग दी आयएस थ्रेट’ या शीर्षकाची श्वेतपत्रिका पंतप्रधान नजीब रझाक यांनी पार्लमेण्टमध्ये सादर केली. इसिसशी दोन हात करण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे आहेत, असे रझाक या वेळी म्हणाले.
दहशतवादी विचारसरणीला सडेतोड जबाब देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासमवेत काम करण्यास मलेशिया कटिबद्ध आहे. त्यामुळे सध्याचे कायदे अधिक कडक करण्याचा प्रस्ताव या श्वेतपत्रिकेद्वारे सादर करण्यात आला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
समाजातील सर्व स्तरांतील जनतेचा याला पाठिंबा मिळेल आणि जनता दहशतवादी विचारसरणीला बळी पडणार नाही, अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. अशा प्रकारची विचारसरणी युवकांनी आणि पालकांनी नाकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सदर १९ पानांच्या श्वेतपत्रिकेत इसिसच्या दहशतवाद्यांची छायाचित्रे आणि त्यांची ठिकाणे यांची माहिती देण्यात आली आहे. मलेशियातील ३९ जण इसिसला बळी पडले असून १९ संशयितांची पुरेशा पुराव्याअभावी आरोपातून मुक्तता झाली आहे, असेही रझाक यांनी पत्रकारांशी बोलताना या वेळी सांगितले.