पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ‘जन्मत: विद्रोही’ असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नोंदवले आहे. मुखर्जी यांनी आपले नवे पुस्तक ‘द कोएलिशन इयर्स’ मध्ये ममतांबाबत लिहिले आहे. एका बैठकीमधून ममता रागाच्या भरात निघून गेल्याचा उल्लेख त्यांनी यात केला आहे. ममतांचे वर्णन करणे कठीण आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेही अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ममतांनी निडर आणि आक्रमकपणे वाटचाल केली आणि हा त्यांच्या स्वत:च्या संघर्षाचाच परिणाम होता, असेही त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

मुखर्जींनी ममतांची एक आठवण सांगितली. १९९२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका या ममता बॅनर्जींसाठी महत्वाच्या ठरल्या. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी त्यांनी पक्षांतर्गत खुल्या निवडणुकीची मागणी केली. मुखर्जी म्हणतात की, पक्ष संघटनेतील पदे आपापसांत वाटून घेत असल्याचा ममतांनी माझ्यावर व राज्यातील काही नेत्यांवर आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे मला धक्का बसला. पक्षात आपल्याला खुल्या निवडणुका हव्यात असे म्हणत त्या रागाने बैठकीतून निघून गेल्या. त्यावेळी मी स्तब्ध झालो. त्यावेळी मला अपमानास्पद वाटले.

पश्चिम बंगालच्या अध्यक्षपदाची निवडणूक गोपनीय पद्धतीने झाली होती. त्यात सोमेन मित्रांकडून ममता या थोडक्यात पराभूत झाल्या होत्या. मुखर्जी म्हणाले, जेव्हा निकाल जाहीर झाले तेव्हा, मी तिथेच होतो. रागात ममता माझ्याजवळ आल्या आणि ‘तुम्ही खूश असाल ?’, मला पराभूत करण्याची तुमची इच्छा पूर्ण झाली, मी त्यांना तुम्ही चुकीचा विचार करत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

ममता यांच्या नेतृत्वाने उभारी घेणं ही पश्चिम बंगालच्या समकालीन राजकारणातील महत्वाची घटना राहिली. त्यांनी निडर आणि आक्रमक पद्धतीने राजकारणात आपले करिअर बनवले. मोठा संघर्ष आणि अपार मेहनतीने त्यांनी राजकारणात अव्वल स्थान पटकावले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विवरण करणे कठीण पण दुर्लक्ष करणे असंभव असल्याचे ते म्हणाले.

१९८४ मध्ये ममतांनी डाव्या आघाडीचे दिग्गज नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा जाधवपूर मतदारसंघातून पराभव केला होता. तो ममता यांचा जबरदस्त विजय होता, असे मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात म्हटले. त्यांना राजकारणात नेहमी आव्हानांचा सामना करावा लागला. या आव्हानांना त्या तितक्याच धाडसीपणाने सामोरे गेल्या. अडचणीचे त्यांनी संधीमध्ये रूपांतर केले, असे गौरवोद्गारही काढले.