ब्रिटनमध्ये २००५ नंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. पोलिसांच्या मते आताचा हल्ला एकाच व्यक्तीने केलेला आहे. लंडनच्या वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात २००५ मध्ये ५२ जण ठार झाले होते. ब्रिटनमध्ये याआधीचा अलिकडचा हल्ला हा वेस्टमिन्स्टर येथील होता, त्यातून दहशतवाद्यांनी मोठय़ा हल्ल्याचे संकेत दिले होते.  मँचेस्टरचा हल्ला अतिशय भयानक होता व तरुणांना यात लक्ष्य करण्यात आले, असे गृहमंत्री अम्बेर रूड यांनी सांगितले.

मँचेस्टरचे पोलिस अधिकारी आयन हॉपकिन्स यांनी सांगितले, की या हल्ल्याची चौकशी वेगाने केली जाईल. एकाच व्यक्तीने आयइडीच्या मदतीने स्फोट घडवला, तो एकटा होता, की आणखी  काही जण त्यामागे होते याचा तपास सुरू आहे. एकूण ४०० पोलिस घटनास्थळी तैनात करण्यात आले. ब्रिटनमधील सर्व राजकीय पक्षांनी या बॉम्बहल्ल्याचा निषेध केला असून त्यांनी आपत्कालीन सेवेची प्रशंसा केली आहे. मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोर्बिन यांनी सांगितले, की मँचेस्टर येथे काल रात्री जे घडले ते भयानक होते, मृतांचे नातेवाईक व जखमींच्या वेदनेत मी सहभागी आहे. मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम यांनी सांगितले, की एका महान शहारातील ती भयानक रात्र होती

आक्रोश, किंकाळ्या व पळापळ

स्टीफनी हिल व त्यांची कन्या केनेडी या दोघी मँचेस्टरच्या पॉप मैफलीस उपस्थित होत्या, त्यांनी सांगितले, की स्फोटानंतर आपत्कालीन सेवा लगेच सुरू झाल्या पण तरी आम्हाला सुरक्षित वाटत नव्हते. सगळीकडे पोलिस होते.त्यांच्या हातात बंदुका होत्या. रुग्णवाहिका सायरन वाजवत होत्या, पोलिस तिथे इतक्या पटकन आले आमचा विश्वास बसेना पण काय चालले आहे तेही कळत नव्हते. आम्हाला तरीही भीती वाटत असल्याने आम्ही पळू लागलो व चाळीस मिनिटांनंतर एका पुलाखाली जाऊन लपलो. केनेडी हिने सांगितले, की स्फोटानंतर काही काळ मैफलीचे ठिकाणच सुन्न झाले व नंतर प्रत्येक जण जीवाच्या आकांताने पळू लागला. रिबेका हॉरॉक्स त्या मैफलीत होती, तिने सांगितले, की स्फोटानंतर आम्ही दरवाजाकडे पळालो. स्फोटाने जमीन हादरली, धुराचे लोट उठले. क्षणभर शांतता होती नंतर अनेक जण ओरडत होते, पळत होते. आम्ही जिंवत राहिलो हे नशीब, इतरांचे काही माहिती नाही. निकी बेटरीज यांनी सांगितले, की अचानक स्फोट झाला, माझ्या मागचे लोक ओरडू लागले, किंचाळू लागले, त्यांनी पळण्यास सुरुवात केली. मी माझी मुलगी समरला हाताशी धरले व पळायला लागले. आमच्याबरोबर शेकडो लोक जीवाच्या आकांताने पळत होते.

जिन्यावर ढकलाढकली सुरू होती, नंतर रस्त्यावर आलो तेव्हा काही लोक पळत होते काही रडत होते. लीडसचे गॅरी वॉकर पत्नीसमवेत कार्यक्रमास गेले होते. ते म्हणाले, की शेवटचे गाणे संपले तेव्हा अचानक स्फोटाचा आवाज झाला.

आम्ही मुलींची वाट पाहत होतो. माझ्या पायाला दुखापत झाली, पत्नीच्या पोटात व पायाला जखम झाली होती. सिमॉन अलसॉप व त्यांची पत्नी सारा मुलींना शोधत होते. शार्लट व तिची मैत्रीण जेमा हिला पाहून त्यांचा जीव भांडय़ात पडला, नंतर ते मोटारीने सुरक्षितपणे तेथून बाहेर पडले.

घटनाक्रम

ब्रिटनमध्ये मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २३ ठार तर ५९ जण जखमी झाले. एका स्टेडियममध्ये अमेरिकी पॉप गायिका अरियाना ग्रँड यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो संपल्यानंतर बॉम्बस्फोट झाला. त्यात आयइडीचा वापर केला होता.

  • स्थानिक वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सार्वजनिक मफलीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला.
  • एकवीस हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या ठिकाणी अरियानाची मफल संपताच स्फोट झाला. ‘डेंजरस वुमन’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होऊन ती जात असताना हा स्फोट झाला.
  • मफलीच्या मूळ ठिकाणापासून बाजूने घुसलेल्या आत्मघाती दहशतवाद्याने बॉम्बस्फोट केले, असे ब्रिटिश दहशतवाद विरोधी चौकशीकर्त्यांनी म्हटले आहे.
  • हल्ला करणारा पुरुष होता व तो व्हिडिओ सुरक्षा यंत्रणेत दिसला होता. पोलिस संशयिताची ओळख पटवण्याच्या प्रयत्नात आहेत.
  • तेथील कॅथ्रेडल उद्यानात काही तासांनी एक बॉम्ब सापडला असे सुरुवातीला वाटले, पण ते टाकून दिलेले कपडे होते.
  • कुणीही अजून या हल्ल्याची जबाबदारी घेतली नसून, अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते नोव्हेंबर २०१५ मध्ये पॅरिसमधील बटाक्लान येथील मफलीवेळी झालेल्या हल्ल्यासारखाच हा हल्ला होता. त्या वेळी १३० जण ठार झाले होते.
  • कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिस सुरक्षेचे कडे करण्यात आले, तर व्हिक्टोरिया स्टेशन बंद करण्यात आले.
  • या मफलीस आलेल्यात जास्तीतजास्त मुली व तरुण स्त्रिया होत्या. पॉप स्टार्सना ऐकण्यासाठी त्या आल्या होत्या. या स्फोटानंतर काही मुले त्यांच्या पालकांपासून वेगळी झाली, त्यांना कुठे जावे हे कळत नव्हते.
  • अमेरिकेची पॉप गायिका अरियाना ग्रँड सुरक्षित आहे. तिच्या प्रवक्त्याने सांगितले, की ती जखमीही झालेली नाही. ती ठीक आहे. नेमके काय झाले याची माहिती आम्ही घेत आहोत.
  • ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार थांबवला.
  • जखमींना आठ रुग्णालयांत दाखल केले.
  • हल्लेखोर घटनास्थळीच ठार.
  • अतिशय भयानक कृत्य- मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम
  • कोब्रा कमिटीची पंतप्रधान थेरेसा मे यांच्या नेतृत्वाखाली बठक
  • मँचेस्टर हॉटलाइन-०१६१ ८५६ ९४००.
  • मृतांमध्ये मुलांचा समावेश.
  • या घटनेने मी आंतरबाहय़ हादरून गेले आहे. या हल्ल्याचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत- पॉप गायिका अरियाना ग्रँड

अरियाना ग्रांदेचा दौरा स्थगित

ब्रिटनमधील मँचेस्टर येथे पॉप मैफलीत बॉम्बस्फोट झाल्यानंतर व्यथित झालेली अमेरिकी गायिका अरियाना ग्रांदे हिने जागतिक दौराच स्थगित केला आहे. या हल्ल्याने झालेले दु:ख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे, असे सांगून ग्रांदे हिने म्हटले आहे, की मी व्यथित झाले असून, बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी घटनेनंतर ज्या वेदना मनात उमटल्या त्या शब्दांत सांगता येणार नाहीत. तिच्या दौऱ्याची आखणी करणाऱ्या टीएमझेड कंपनीने म्हटले आहे, की या दहशतवादी हल्ल्यानंतर अरियाना हिने जागतिक दौरा बेमुदत स्थगित केला आहे. संकेतस्थळावर म्हटले आहे, की गुरुवारी लंडनमध्ये होणारा कार्यक्रम आता रद्द केला आहे व युरोपचा दौराच स्थगित करण्यात येत आहे. इंग्लंड, बेल्जियम, पोलंड, जर्मनी, स्वित्र्झलड या देशांत तिचे कार्यक्रम होणार होते. ग्रांदे हिचा व्यवस्थापक स्कूटर ब्रॉन याने म्हटले आहे, की हा भ्याड हल्ला होता. लोक यात बळी पडले. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मँचेस्टरमध्ये अनेकांनी या हल्ल्याच्या वेळी मदतकार्य केले व लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्या नि:स्वार्थी सेवेचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

अरियाना ग्रांदे कोण आहे..

अरियाना ग्रांदे ही अमेरिकी टीव्हीवरील तरुण अभिनेत्री असून अवघी २३ वर्षांची आहे. ती पॉप गायिका असून तरुणवर्ग तिचा चाहता आहे. ‘प्रॉब्लेम’, ‘साइड टू साइड’ या तिच्या रचना हीट ठरल्या. युरोप दौऱ्यात तिचे बर्मिगहॅम व डब्लिन येथील कार्यक्रम झाले होते उद्या व गुरुवारी लंडनच्या ‘ओ २’ एरिनात तिचा कार्यक्रम होता. तिच्या आताच्या ‘द डेंजरस वूमन टूर’चा उद्देश ‘डेंजरस वुमन’ या तिसऱ्या स्टुडिओ अल्बमचा प्रसार हा होता. हा अल्बम गेल्या वर्षी २० मे रोजी प्रकाशित झाला आहे. तिचे कार्यक्रम ३ फेब्रुवारीपासून अ‍ॅरिझोनातील फिनिक्स येथून सुरू झाले. २०१४ मध्ये तिचा ‘माय एव्हरीथिंग’ हा अल्बम आला होता.