नोटाबंदीनंतर शेवटाची सुरुवात झाली आहे हे तर आम्हाला आता कळून चुकले आहे, पण त्याचे आणखी वाईट परिणाम अजून सामोरे येतील, अशा शब्दांत माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयावर घणाघाती टीका केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जनवेदना संमेलनात ते बुधवारी बोलत होते. ते म्हणाले, की मोदींनी देशाची अर्थव्यवस्था बदलून टाकण्याची भाषा केली, पण आता नोटाबंदीमुळे शेवटाचा प्रारंभ झाला आहे.

नोटाबंदीचे आणखी गंभीर परिणाम सामोरे येतील. गेल्या दोन वर्षांत मोदी यांनी राष्ट्रीय उत्पन्न वाढत असल्याचा प्रचार केला, पण त्यांचे दावे पोकळ आहेत. ते खोटे ठरले. भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदीनंतर वाईटाकडून आणखी वाईटाकडे चालली आहे व त्याचे आणखी गंभीर परिणाम लवकरच सामोरे येतील. नोटाबंदीचा निर्णय घातक होता, त्यामुळे देशाला आर्थिक फटका बसला.

सर्व मानांकन संस्थांनी देशाची अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांवरून ७ टक्के व नंतर ६.३ टक्के इतका विकासदर गाठेल असे सांगितले. विकासदराचे अंदाज नोटाबंदीनंतर खाली आले. देशाच्या उत्पन्नात ४५ टक्के वाटा असलेल्या कृषी व असंघटित क्षेत्रात रोजगार घटले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले, की नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत बनली व लाखो लोकांना फटका बसला.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशिवाय जगात कुणीही नोटाबंदीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाला फटका बसणार नाही असे म्हटलेले नाही.