मॉलमधील स्वयंचलित जिन्यामध्ये पाय अडकल्याने तिथेच सफाईचे काम करणाऱया एका कर्मचाऱयाला आपला एक पाय गमवावा लागला. शांघायमधील एक मॉलमध्ये हा प्रकार घडला. अगदी काही दिवसांपूर्वीच मॉलमधील स्वयंचलित जिन्यामुळे एक महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एका माणसाला पाय गमवावा लागल्यामुळे या जिन्यांचा वापराचा मुद्दा चीनमध्ये चर्चेत आला आहे.
स्वयंचलित जिन्याची सफाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱयाचा डाव पाय रविवारी त्यामध्ये अडकला. त्यानंतर इतर कर्मचाऱयांनी प्रयत्न करून कर्मचाऱयाला बाहेर काढले. आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांना तो पाय कापून काढवा लागला. स्वयंचलित जिन्यावर अपघात घडण्याची चीनमधील आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. चीनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या २४ लाख स्वयंचलित जिने आहेत. या सर्व ठिकाणी सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, स्वयंचलित जिन सुरू असताना त्याची स्वच्छता करणे धोकादायक आहे. त्यावर संपूर्ण चीनमध्ये बंदी घालण्याची गरज आहे.
गेल्याच आठवड्यात स्वयंचलित जिनाच कोसळल्यामुळे ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.