केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हंगामी अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर चारचाकी वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या मारुती आणि ह्युंदाई या दोन कंपन्यांनी आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती कमी करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.
मारुतीने आपल्या सर्व प्रकारच्या मॉडेल्सच्या किमतींमध्ये ८,५०२ पासून ३०,९८४ पर्यंत कपात केली. त्याचवेळी ह्युंदाईने आपल्या गाड्यांच्या किमती १०,००० पासून १,३५,३०० पर्यंत कमी केल्या आहेत.
उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे होणाऱा फायदा ग्राहकांना मिळावा, यासाठी सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये कपात करण्यात आल्याचे मारुती उद्योगसमुहाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ह्युंदाईनेही ग्राहकांच्या फायद्यासाठीच सर्व प्रकारच्या मॉडेल्सच्या किमती कमी केल्याचे स्पष्ट केले. ह्युंदाईच्या ई-ऑनपासून ते सॅन्टा एफई या मॉडेलपर्यंत सर्वांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.