केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या एफएसएसएआय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेने मॅगी नूडल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्याने नेस्ले इंडिया कंपनीला प्रोत्साहन मिळाले आहे. देशातील अन्न सुरक्षा मानकांचे पालन झाल्याचे प्रयोगशाळेने म्हटले आहे.
गोवा अन्न आणि औषध प्रशासनाने पाठविलेल्या पाच नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा शिशाचे प्रमाण जास्त असल्याने जून महिन्यात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले असल्याचे नमुन्यांच्या चाचणीतून स्पष्ट झाले आहे, असे गोव्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक सलीम वेलजी यांनी सांगितले.
शिशाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याने गोवा अन्न-औषध प्रशासनाने म्हैसूर येथील प्रयोगशाळेत मॅगी नूडल्स चाचणीसाठी पाठविले होते. काही राज्यांनी बंदी घातल्यानंतर नेस्ले कंपनीने जून महिन्यात मॅगीचे उत्पादन आणि विक्री थांबविली होती. मानवी सेवनासाठी मॅगी योग्य नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला होता.
दरम्यान नेस्लेची मॅगी पुन्हा बाजारात आणणे याला आपले प्राधान्य असेल असे नेस्ले इंडियाचे नवे प्रमुख सुरेश नारायण यांनी सांगितले.