टायटॅनिक हे अॅटलांटिक महासागरात बुडालेले जहाज शोधण्यासाठी उपयोगात आणलेल्या शक्तिशाली प्रणालीसारखी सोनार यंत्रणा आता मलेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचा सांगाडा शोधण्यासाठी वापरण्याचा विचार चालू आहे.
   अमेरिकेची यांत्रिक बाहू असलेली पाणबुडी मात्र अद्याप या विमानाचा सांगाडा शोधण्यात अपयशी ठरली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे सागरी सुरक्षा प्रमुख मार्टिन डोलान यांनी सांगितले की, पर्थच्या दक्षिणेला ऑगस्टाच्या किनाऱ्यावर २.५ मीटरचा आयताकृती तुकडा सापडला असून ते धातूच्या पत्र्याला फायबर ग्लासचे आवरण आहे, बेपत्ता विमानाशी त्याचा काही संबंध असू शकतो त्याबाबत शोध घेतला जात आहे. या वस्तूची छायाचित्रे घेऊन ती मलेशिया व चीनच्या शोध संस्थेला पाठवण्यात आली आहेत. पोलिसांनी त्य् ऑस्ट्रेलिया आता मलेशिया, चीन व अमेरिका या तीन देशांशी विमानाचा पुढील शोध कसा घ्यायचा याबाबत चर्चा करीत आहे.
२९ वर्षांपूर्वी १९८५ मध्ये टायटॅनिक बोट अॅटलांटिक महासागरात ३८०० मीटर खोलीवर सापडली होती, ही बोट १५ एप्रिल १९१२ रोजी बुडाली होती त्या वेळी सोनार यंत्र असलेली जी शक्तिशाली प्रणाली वापरण्यात आली होती, तिचा वापर आताच्या विमानाचे अवशेष शोधण्यासाठी करण्याचा विचार आहे. एचएमएएस सिडनी या ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या महायुद्धात बुडालेल्या जहाजाचा शोधही याच प्रणालीने घेतला होता, ते जहाज २००८ मध्ये आताच्या विमानाचा शोध घेतला जात आहे त्याच्या उत्तरेला सापडले होते.
ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री डेव्हिड जॉनस्टन यांनी सांगितले, की जास्त सक्षम सोनार यंत्रणा असलेली यंत्रणा खोलवर पाठवून विमानाच्या संभाव्य अवशेषांचा शोध घेणे ही पुढची पायरी आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांनी सांगितले, की आताच्या मलेशियन विमानाचे कोसळण्याचे क्षेत्र ७०० किमी लांब व ८० किमी रुंद असू शकते. त्यामुळे सध्याच्या शोधात काही सापडले नाहीतर नवीन तंत्र वापरावे लागेल.
जॅक या वादळामुळे हवामान खराब झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. अमेरिकेच्या ब्लूफिन २१ या नौदलाच्या सोनार यंत्र असलेल्या छोटय़ा पाणबुडीने शोध घेतला. आता या पाणबुडीने शोधक्षेत्राच्या ८० टक्के भागाचा शोध पूर्ण केला आहे.
 विमान बेपत्ता होण्यास ४७ दिवस पूर्ण होऊनही काहीच ठावठिकाणा सापडलेला नाही. ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा प्राधिकरणाच्या मते दृश्य शोधक्षेत्र ३७,९४८ चौरस किमी असून ते ठिकाण पर्थच्या वायव्येस १५८४ किमी अंतरावर आहे.