बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यावरून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप दोन मुस्लीम महिलांनी केला आहे. या महिलांकडे गोमांस असल्याच्या संशयावरून बुधवारी मंडसौर रेल्वे स्थानकांत त्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी जीआरपीने चार जणांना अटक केली आहे.

आम्ही मंडसौर येथे येत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अडविले आणि आमच्याकडे काय आहे याची विचारणा केली. आमच्याकडे म्हशीचे मांस आहे असे आम्ही त्यांना सांगितले, मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही ते गोमांसच असल्याचे ते म्हणत होते, असे सलमा नावाच्या एका महिलेने सांगितले. या मांसाची पशुवैद्यकांकडून तपासणी करून घ्या, असे आम्ही त्यांना सांगितले ते त्यांनी अमान्य केले आणि त्यांच्यासमवेत असलेल्या अन्य महिलांना आम्हाला मारहाण करण्यास सांगितले, असा आरोप सलमा यांनी केला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धमकी दिली, असा आरोपही सलमा यांनी केला. सलमा मेवाटी (३५) आणि शमीन अख्तर हुसेन (३०) यांना स्वयंघोषित गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी या महिलांना गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अटक केली. मात्र तपासणीनंतर ते मांस म्हशीचे असल्याचे निष्पन्न झाल्यावर या महिलांवरील आरोप मागे घेण्यात आले. स्थानिक न्यायालयाने बुधवारी त्यांना जामीन मंजूर केला.