वादाच्या पाश्र्वभूमीवर गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरूंची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहि:स्थ विद्यार्थी म्हणून गुजरात विद्यापीठाचा एमएचा पदव्युत्तर अभ्यासक्रम ६२.३ टक्के मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण केला होता, अशी माहिती देत गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू एम. एन. पटेल यांनी मोदींच्या पदवीविषयक वादावर काहीसा पडदा टाकला आहे.
मोदींच्या पदवीविषयक माहिती मिळवण्यासाठी अनेक जणांनी माहितीच्या कायद्यांतर्गत अर्ज केले होते. पण नेमकी माहिती मिळत नसल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय माहिती आयुक्तांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मोदींचा नेमका परीक्षा आणि विद्यार्थी क्रमांक मिळाल्यास पदवीविषयी माहिती शोधणे सोपे जाईल, असे गुजरात आणि दिल्ली विद्यापीठाने म्हटले होते. आता गुजरात विद्यापीठाने मोदींच्या पदवीविषयक माहिती जाहीर केली आहे.
त्यानुसार मोदी यांनी गुजरात विद्यापीठातून १९८३ साली राज्यशास्त्रात एमएची पदवी मिळवली. ते विद्यापीठाचे बहि:स्थ विद्यार्थी होते. त्यांना एकूण ८०० पैकी ४९९ म्हणजे ६२.३ टक्के गुण मिळाले होते. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी त्यांना ४०० पैकी २३७ तर दुसऱ्या वर्षी ४०० पैकी २६२ गुण मिळाले होते. दुसऱ्या वर्षी त्यांना राज्यशास्त्रात ६४, युरोपीय आणि सामाजिक-राजकीय विचार या विषयात ६२, आधुनिक भारत/राजकीय विश्लेषण या विषयात ६९ तर राजकीय मानसशास्त्र या विषयात ६७ गुण मिळाले होते.

एलपीजी जोडणी योजनेची उत्तर प्रदेशातून सुरुवात
बलिया: यापूर्वीच्या सरकारांनी मतपेटी डोळ्यापुढे ठेवून धोरणे आखली. गरिबांच्या कल्याणासाठी विशेष काही केले नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.गरीब कुटुंबांना घरगुती गॅसच्या (एलपीजी) ५ कोटी जोडण्या देण्यासाठी ८ हजार कोटी रुपयांच्या ‘उज्ज्वला’ योजनेचे मोदी यांनी रविवारी उद्घाटन केले. ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत’ दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांतील महिलांच्या नावाने मोफत एलपीजी जोडण्या दिल्या जाणार आहेत. पहिल्या वर्षांत अशा दीड कोटी जोडण्या दिल्या जाणार असून, ५ कोटी जोडण्या देण्याचे उद्दिष्ट येत्या तीन वर्षांमध्ये पूर्ण केले जाईल.