मूठभर उद्योगपतींच्या लाभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोळसा क्षेत्राचे खासगीकरण करण्याची योजना आखली असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी येथील निवडणूक जाहीर सभेत केला.
काँग्रेसने जनतेच्या भल्यासाठी कोळसा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण केले तर आता भाजप मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी या क्षेत्राचे खासगीकरण करण्याची योजना आखत आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. इतकेच नव्हे तर माहितीच्या अधिकाराचा कायदा, मनरेगा आणि भूसंपादन कायदा दुर्बल करण्याची योजनाही मोदी सरकारने आखली आहे.
आदिवासी आणि दलितांच्या भल्यासाठी पूर्वीच्या यूपीए सरकारने हे कायदे केले होते, असेही त्या म्हणाल्या. गुजरातमध्ये आठ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे, परंतु त्यापैकी बहुसंख्य जण विस्थापित आहेत. कारण राज्य सरकारने भांडवलदारांच्या लाभासाठी भूसंपादन केले आहे, असेही गांधी म्हणाल्या.