जी-२० परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर जागतिक नेत्यांची वैयक्तिक माहिती चुकून दुसऱयाच व्यक्तीला ई-मेलद्वारे गेल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या निष्काळजीपणाबाबत भारत सरकार आवश्यक ती कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सर्व जागतिक नेत्यांची वैयक्तिक माहिती ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन विभागाकडून चुकून आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा आयोजित करणाऱया समितीच्या एका सदस्याला ई-मेलद्वारे गेली होती. झालेली चूक कळून आल्यानंतर तात्काळ संबंधित समितीच्या सदस्याला मिळालेली माहिती नष्ट करण्यास सांगण्यात आले. याबाबत एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱयाने सांगितले की, “झालेल्या घटनेबद्दल प्रसिद्ध झालेला अहवाल पाहिला असून आपल्या बाजूने योग्य तो तपास करून खबरदारी घेण्यात येत आहे.”
या ई-मेलमध्ये मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल, चीनचे अध्यक्ष क्षी-जिनपिंग यांच्यासह एकूण ३१ जागतिक नेत्यांचे पासपोर्ट क्रमांक, व्हिसा आणि इतर माहिती होती.